सुसंस्कृत समाज व्यवस्थेसाठी अध्यात्मिक साधना गरजेची – ह.भ.प. सौ.वनिताताई पाटील

सुसंस्कृत समाज व्यवस्थेसाठी अध्यात्मिक साधना गरजेची - ह.भ.प. सौ.वनिताताई पाटील
सुसंस्कृत समाज व्यवस्थेसाठी अध्यात्मिक साधना गरजेची - ह.भ.प. सौ.वनिताताई पाटील
सुसंस्कृत समाज व्यवस्थेसाठी अध्यात्मिक साधना गरजेची - ह.भ.प. सौ.वनिताताई पाटील

उदगीर (एल. पी. उगिले) : समाज व्यवस्थेत युवकांना कोणत्या मार्गाने जाऊ द्यायचे? याची ताकद असते. सुसंस्कृत समाजा रचना आज काळाची गरज आहे. आणि हे संस्कार अध्यात्मिक साधनेतून आणि संस्कारातूनच होत असतात. त्यासाठी भजन, कीर्तन यासोबतच आई-वडिलांच्या बद्दल निष्ठा, प्रेम, जिव्हाळा गरजेचा आहे. प्राधान्याने हिंदू संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था हा समाज व्यवस्थेचा कणा असल्यामुळे स्त्री शक्ती मुळे अर्थात मातृ शक्तीमुळे कुटुंब व्यवस्था टिकून आहे. असे बहुमोल विचार प्रख्यात कीर्तनकार ह. भ. प. सौ. वनिताताई पाटील यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर येथील श्री रोकडे हनुमान युवक गणेश मंडळ आणि मनोज अण्णा कपाळे यांच्या कपाळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महादेव मंदिर, कपाळे गल्ली उदगीर येथे आयोजित कीर्तन आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमातून भाविक भक्तांना प्रबोधन करत होत्या.
याप्रसंगी त्यांनी संस्काराचे महत्त्व तर सांगितलेच सांगितले, त्यासोबतच युवा पिढीसाठी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीव जपण्याचे महत्त्वही विशद केले.
प्रथमतः ह.भ.प. सौ. वनिताताई पाटील यांचे स्वागत आणि सत्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन रीतसर राजेश्वर निटुरे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती रामराव मामा बिरादार हेही उपस्थित होते.
पुढे बोलताना आपल्या रसाळ वाणीतून ह. भ. प. सौ. वनीताताई पाटील यांनी भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवर सर्वात आदर्श आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे विवाह संस्था टिकून आहेत, आणि या विवाह संस्थेमुळे पारिवारिक वातावरण आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये जिव्हाळा, प्रेम कायम टिकून राहते. या व्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग महिला आहेत. कारण महिला या कुटुंब व्यवस्थेचा धागा आहेत. त्यामुळेच ही टिकून आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून करावी. असेही आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक युवकांनी आपल्या आई-वडिलांबद्दल निष्ठा ठेवावी. दुर्दैवाने आज वृद्धाश्रम वाढत चालले आहेत, विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे संस्काराचे बीजारोपण म्हणावे त्या पद्धतीने होत नाही. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने सुसंस्काराचे रक्षण केले पाहिजे. आणि यासाठीच हिंदू धर्मामध्ये सण, उत्सव, परंपरा कायम आहेत. कारण यातूनच सर्वजण एकत्र येतात, एक दुसऱ्याच्या सुखदुःखाची विचारपूस करतात, आणि यातूनच मग प्रेम वाढत जाते.

सामाजिक बांधिलकी आणि आपण या समाजाचे काही देणे लागतो. ही भावना वाढीस लागते. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. उत्सवातूनच आपला उत्कर्ष आणि प्रगती होत असते. भजन, कीर्तन, बौद्धिक व्याख्यानाचे कार्यक्रम सतत झाले पाहिजेत. त्यामुळे मन आणि आत्मा अध्यात्माकडे वळायला लागतो. ज्या पद्धतीने पेटलेला निखारा जर काही वेळ तसाच राहिला तर त्यावर राख जमा होते. ती घालवण्यासाठी फुंकर मारावी लागते, तीच फुंकर कीर्तन, भजन, व्याख्यान यातून होत असते.
भजन आणि कीर्तन हा सुसंस्काराचा गाभा आहे. याची जाणीव नव्या पिढीला झाली पाहिजे. पैसा महत्त्वाचा आहे, मात्र पैसा म्हणजे सर्वस्व. ही भावना चुकीची आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागले पाहिजे. कितीही पैसा असला तरी पैशाने आई-वडील मिळू शकत नाहीत. याचे भान ठेवले पाहिजे.

आई-वडील हयात असेपर्यंत त्यांची सेवा करा. कारण प्रत्येक घरापर्यंत परमेश्वराला जाता येत नाही, म्हणून आई-वडिलांच्या रूपाने परमेश्वरच त्या कुटुंबाचे संरक्षण आणि संवर्धन करत असतो. त्यामुळे आई-वडिलांना सांभाळा. असेही मौलिक विचार आपल्या कीर्तनातून ह. भ. प. सौ. वनिताताई पाटील यांनी व्यक्त केले.

या कीर्तनासाठी बाल भजनी मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये कुमारी आराध्या पाटील या चिमुकलीने गवळण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. नंदकुमार पटणे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष महेंद्र वीरकपाळे, कार्याध्यक्ष सुनील कपाळे, उपाध्यक्ष महेश देशमुख, सचिव विजयकुमार लदाडे, कोषाध्यक्ष कल्याण कपाळे, सहसचिव संगम सुरशेटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author