महात्मा गांधी महाविद्यालयाची विठू माऊली म्हणजे : प्राचार्य कॅप्टन विठ्ठलराव ढोबळे सर
मानवी जीवन हे नश्वर आहे. पण मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याने कसे जीवन जगले यावर त्याच्या जीवनाचे मूल्य ठरते.अनेक माणसे जन्मल्यापासूनच स्वतःच्या स्वार्थासाठी मरमर करतात व एके दिवशी मरून जातात.ना त्यांच्या जाण्याची खंत परिवाराला असते ना समाजाला.’कहां गये तो कही भी नही l और क्या लाया तो कुछ भी नही ll’ असेच ते जगून जातात पण काही माणसे मात्र आपल्या वाट्याला आलेले काम हीच ईश्वर भक्ती या ईश्वर पूजा इतके पवित्र समजून त्यासाठी सतत कर्मरत राहतात.हीच त्यांची ईश्वर भक्ती असते.याविषयी ज्ञानेश्वरी ग्रंथात ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे की ‘तया सर्वात्मका ईश्वरा l स्वकर्म कुसुमांचिये वीरा l पूजा केली होय अपारा l तोषालागी ll असे जीवन ते जगत असतात.असे जीवन जगणारी माणसे शरीराने गेली तरी कर्माने ते मागे उरतात. त्यांची कीर्ती आजरामर राहते.असेच अहमदपूर तालुक्यातीलच नव्हे, तर ‘अहमदपूर पॅटर्नच्या’ माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ओळख निर्माण केली असे व्यक्तिमत्व म्हणजे माझे गुरुवर्य प्राचार्य कॅप्टन विठ्ठलराव ढोबळे सर होत. पूर्वी संस्थाचालकांच्या नावावरून नाही तर प्राचार्यांच्या नावावरून महाविद्यालये ओळखली जायची.जसे उदयगिरी महाविद्यालय,उदगीर हे प्राचार्य ना.य.डोळे सरांच्या नावाने,आदर्श महाविद्यालय,हिंगोली हे प्राचार्य जे.एम.मंत्री सरांच्या, राजर्षी शाहू महाविद्यालय हे प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे व प्राचार्य अनिरुद्ध जाधव सरांच्या तसेच महात्मा गांधी महाविद्यालय,अहमदपूर हे प्राचार्य कॅप्टन विठ्ठलराव ढोबळे सरांच्या नावाने ओळखले जायचे.अहमदपूर हा तालुका तसा सर्वच बाबतीत मागासलेला.इथे निजामाची सत्ता होती.तेंव्हापासून गुलामवृत्ती बाळगून जगण्याची प्रवृत्ती अधिक होती.यातून बाहेर पडण्यासाठी व स्वाभिमान निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक होते ही बाब लक्षात घेऊन त्या काळातील काही जुन्या जाणत्या शिक्षणप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन विचार विकास मंडळ अहमदपूरची स्थापना केली व शहरापासून काही अंतरावर असलेले या संस्थेचे महात्मा गांधी महाविद्यालय हे अहमदपूरला स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांनी म्हणजे महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून १९६९ साली महात्मा गांधी यांच्याच नावे सुरू केले. हे महाविद्यालय सुरू करणारी संस्थाचालक मंडळी ही विविध परिवारातून,जाती-धर्मातून एका विचाराने व एका ध्येयाने प्रेरित होवून एकत्र आलेली होती.त्यातूनच त्यांनी महाविद्यालयात गुणवान होतकरू प्राध्यापकवर्ग नियुक्त केला. हे करताना त्यांनी गुणवत्तेशी कसलीच तडजोड केली नाही.त्यामुळे या महाविद्यालयाला विद्वानवर्ग मिळाला. एखाद्या शहराचा सर्वार्थाने कायापालट कसा चांगली शैक्षणिक संस्था उभी राहिल्यानंतर होतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे महात्मा गांधी महाविद्यालय आहे.येथील अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांचा वैचारिक दबदबा त्यांच्या त्यांच्या विषयात राज्यस्तरापर्यंत होता.याचे सर्व श्रेय तत्कालीन संस्थाचालक कै.आ. भगवानराव नागरगोजे,भाई किशनरावजी देशमुख व अन्य संचालक मंडळाला जाते.ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षातली असली तरीही त्यांनी महाविद्यालयात येताना मात्र आपले राजकीय जोडे बाहेर ठेवूनच महाविद्यालयात प्रवेश केला. महाविद्यालयाची वा विद्यालयाची प्रगती करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती तेथील प्रमुखाची. प्रमुख जर शिस्तप्रिय, प्रामाणिक, चारित्र्यवान,नि:पक्षपाती व अन्य चांगुलपणाने भरलेला नसेल तर सर्व डोलारा हळूहळू कोसळतो.म्हणतात ना ‘जसा राजा, तशी प्रजा’ पण प्रमुख जर कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, शिस्तप्रिय व परिस्थितीची जाणीव असणारा नि:पक्षपाती असेल,तर त्या संस्थेची पर्यायाने विद्यालय,महाविद्यालयाची भरभराट व्हायला वेळ लागत नाही. सर्वांना विश्वासात घेऊन काम केले की, काम दुपटीने व आनंदाने होते.असाच सूत्रधार किंवा प्रमुख मी या महाविद्यालयात १९८६ पासून १९८९ पर्यंत बारावी ते बी.ए.ची पदवी प्राप्त करेपर्यंत अनुभवला. ते म्हणजे प्राचार्य कॅप्टन विठ्ठलराव ढोबळे सर होत.सर १९६९ मध्ये या महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक म्हणुन कार्यरत होते.तदनंतर ते १९८२ पासून २००४ पर्यंत म्हणजे सेवानिवृत्ती पर्यंत या महाविद्यालयाचे प्राचार्य होते.तदनंतर ही संस्थेने शैक्षणिक समन्वयक म्हणुन त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती.सर जरी विज्ञानशाखेतील गणित विषयाचे असले तरी ते सर्व विद्याशाखांतील सर्वांशीच अत्यंत प्रेमाने आणि सौहार्दपणे वागत असत.अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा दरारा होता.कारण ते एन.सी.सी चे कॅप्टन होते. त्यामुळे या महाविद्यालयात एन.सी.सी.चे युनिट अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असे. या कामी प्रा.डॉ.सोनवणे सर व मेजर डॉ.निर्मला कोरे मॅडम यांचेही योगदान महत्त्वाचे राहिले आहे.आम्हाला प्राचार्याच्या कक्षात जाताना भीती वाटायची इतके नैतिक वजन सरांचे होते.महात्मा गांधी महाविद्यालयात शिकणारी जवळ जवळ ९०% मुले मुली हे शेतकऱ्यांची होती.त्यातले त्यात घरातल्या पहिल्या पिढीतील अधिक होती.त्यामुळे या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. याशिवाय या मुलांचा खऱ्या अर्थाने उद्धार होणार नाही म्हणून संस्थाचालक, प्राचार्य व प्राध्यापक अत्यंत तळमळीने शिकवत असत. एवढेच नाही तर गरिबांच्या मुलांसाठी कस्तुरबा वसतीगृहाची उभारणीही केली होती.सायंकाळच्या वेळी अनेक प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात किंवा घरी जाऊन देखील त्यांच्या अध्ययनाबद्दलची चौकशी करत असत.हे वसतिगृह चालवताना येथील प्राचार्य व प्राध्यापकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.अशा अवस्थेतही प्राचार्य व प्राध्यापकांनी हे वसतिगृह चालविले. या वसतिगृहात शिकलेल्या माझ्या सोबतच्या १०० टक्के मुलांपैकी जवळपास ९० ते ९५ टक्के मुले ही जीवनात नोकरी व अन्य क्षेत्रात यशस्वी झाली आहेत. हे यश या महाविद्यालयाचे होते.रात्रीला जास्तीचे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास इथे घेतला जात असे.अनेक प्राध्यापकांची उद्बोधक मार्गदर्शन देखील आयोजित केले जायचे.विद्यार्थी संसदेच्या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या जात असत.कारण अध्ययन अध्यापनाकडे दुर्लक्ष होईल म्हणून. सगळ्यात महत्त्वाचे प्राधान्य येथे अध्ययन व अध्यापनाला दिले जात असे.अशा पध्दतीने हे महाविद्यालय अनेक पिढ्या घडवत होतं.या महाविद्यालयाने माझ्यासारख्या सर्वसाधारण कोरडवाहू शेतकरी कुटुंबातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याचे बळ दिलं.त्यात प्राचार्य ढोबळे सरांचा खूप मोठा वाटा होता. त्यांच्या जोडीला अत्यंत शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे पण न्यायप्रिय उपप्राचार्य पानपट्टे सर होते.ज्यांचा एक वेगळा दरारा त्या काळात आम्ही अनुभवला. राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ. भूषणकुमार जोरगुलवार, हिंदीचे प्रा. शाम आगळे सर, इंग्रजीचे प्रा.ए.पी. मुंडे सर, प्रा.सौ.ललिता गादगे मॅडम, इतीहासाचे प्रा.ए.ओ.मगरे सर, मराठीचे प्रा.निशिकांत देशपांडे सर, डाॅ.मा.ना.कागणे सर, डाॅ. डी. ए. कुलकर्णी सर तसेच विज्ञान शाखेचे असूनही सतत सर्वच विद्यार्थ्यांत मिळून मिसळून राहून शिक्षणाचे महत्त्व समजून देणारे प्रा.डॉ.वाय.बी. गायकवाड सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.डाॅ.नागनाथ मोटे सर यासारखे गुरुजन आम्हाला लाभले.ही गुरु मंडळी त्या काळात लाभली नसती तर? असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला की, काळाकुट्ट अंधकार डोळ्यासमोर उभा राहतो. प्राचार्य ढोबळे सर व या गुरुवर्यांनी कधी घडाळ्याचा काटा पाहून काम केले नाही.या सर्वांचे पाय घरापेक्षा महाविद्यालयातच अधिक रमत असे. ढोबळे सरांचे कॅप्टन हे नाव वाचताना त्या काळी आमचा ऊर भरून यायचा. तसेच सरांचे व्यक्तिमत्व अत्यंत रुबाबदार होते.उंचेपुरे तगडे व्यक्तिमत्व पाहून मन भरून यायचे.सर बोलले की,ईश्वर बोलल्याचा आनंद व्हायचा. माझ्या आयुष्यातील वक्तृत्वाचे पहिले पारितोषिक ढालरुपाने मला प्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे व प्राचार्य ढोबळे सरांच्या हस्ते मिळाले होते. तेंव्हा सरांनी मला वक्तृत्वासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या व सर्व विद्यार्थ्यांसमोर कौतुक केले होते. माझा वक्ता बनण्याचा पाया हा प्राचार्य ढोबळे सरांनीच घातला. आयुष्यातील पहिले भाषण मी याच महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेत दिले होते. त्यावेळी प्रा.डॉ.मोटे सरांनी मला दिलेले प्रबलन मी आजही विसरलेलो नाही.माणूस म्हणून जी आपल्यात सामाजिक बांधिलकी असावी लागते ती येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांनी व प्राध्यापकांनी आमच्यात रुजविली.हे कधीही विसरता येणार नाही.महात्मा गांधी महाविद्यालयाला क्रीडा क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कधी कधी देशभर नावलौकिक मिळवून देण्यात प्राचार्य ढोबळे सरांचे व त्यासोबत प्रा. गणपत माने सर व प्रा. नलवाड सरांचे खूप मोठे योगदान होते. ग्रामीण भागातील अनेक खेळाडू या महाविद्यालयाने घडवले.महात्मा गांधी महाविद्यालयाने आम्हाला अभ्यासाची सवय लावली. कॉपी कशी करतात हे आयुष्यात शिक्षण संपेपर्यंत कधीच माहिती नव्हते.कारण या महाविद्यालयात कॉपीला बिल्कुल स्थान नव्हते. त्यामुळे आम्ही घडलो. याचे सर्व श्रेय संस्थाचालक, प्राचार्य ढोबळे सर, प्रा.पानपट्टे सर व येथील प्राध्यापकांना द्यावे लागते.म्हणतात ना – अन्नदानम् महादानम् l विद्यादानं परम तथा l अन्नेन क्षणिक तृप्ती l याव जीविकां तु विद्या ll’ हे विद्यादान त्यांनी आम्हाला दिले. राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे म्हणजे ज्ञान व कर्म यांचा सुरेख संगम असायचा. या शिबिरात गावाला सर्वार्थाने बदलून टाकले जायचे. ढोबळे सरांनी संस्था,प्राध्यापक, पालक व विद्यार्थी यांच्यात सुयोग्य समन्वय करून अनेक कष्ट उपसून या महाविद्यालयाला सर्वांच्या साथीने महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालय बनवले.नलाबले या विद्यार्थिनीने बारावीत राज्यातून प्रथम क्रमांक मिळवला व त्यातून विशेषतः अकरावी बारावीसाठीचा ‘अहमदपूर पॅटर्न’ या विठू माऊलीने आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन तयार केला. महाविद्यालयाच्या कामाची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अनेक वेळेस घ्यावी लागली. त्यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल १९९४-९५ मध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. अहमदपूरचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे चमकू लागले. अहमदपूर शहराचा कायापालक झाला.सर्वार्थाने अहमदपूर प्रगतीपथाकडे अग्रेसर झाले. त्यांनी निर्माण केलेला ‘अहमदपूर पॅटर्न’बरेच वर्षे महाराष्ट्रात दबदबा निर्माण करून होता.त्या काळात या भागातील हजारो विद्यार्थी डॉक्टर्स व इंजिनिअर्स बनले. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घेता आले. याचे बरेचसे श्रेय प्राचार्य ढोबळे सरांना द्यावे लागेल.त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सुरुवातीच्या उभारणीच्या काळात विविध समित्यांवर अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले. तसेच प्रभारी कुलगुरू पद ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले. प्राचार्यांनी तालुका स्तरावर काम करताना किती बंधने पाळून,चारित्र्य सांभाळून राहिले पाहिजे व नैतिक वजन कसे निर्माण केले पाहिजे याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे प्राचार्य ढोबळे सर होत.महाविद्यालयाचा भौतिक, नैतिक व शैक्षणिक या सर्व दृष्टीने विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.मी प्राचार्य झाल्यावर त्यांना अतिव आनंद झाला होता. माझ्या महाविद्यालयात ते मुखेडला अनेक वेळा आले तेंव्हा तेंव्हा ते अभिमानाने माझा उल्लेख आमचा आवडता विद्यार्थी म्हणून करायचे.मला प्राचार्य पदाच्या काळात अडचण आली व मी फोन केला किंवा प्रत्यक्ष भेटलो तर विस्ताराने प्रशासना संबंधाने मार्गदर्शन करायचे.नंतर पुढे पुढे सरांची तब्येत बिघडली होती. त्यातून ते सावरले नाहीत.काल ते हे जग सोडून गेल्याचे समजले.अतिव दुःख झाले.माझा महाविद्यालयीन काळ डोळ्यासमोर लक्खपणे उभा राहिला व त्यात ढोबळे सरांचे योगदान ठळकपणे अधोरेखित झाले.त्यामुळे त्यांच्याविषयी लिहिण्याशिवाय चैनच पडली नाही. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयाची खऱ्या अर्थाने विठू माऊली आज आम्हास पोरके करून गेली. हे कधीच न भरून निघणारे दुःख आहे. शेवटी मानव जन्मात एक न एक दिवस आपणास जावेच लागणार आहे. त्याच पद्धतीने सर आज गेले. पण त्यांनी केलेल्या कार्याचा सुगंध मात्र ते ठेवून गेले. अनेक पिढ्या भविष्यात ही त्यांच्या कार्याचे गुणगान करत राहतील व त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतील.या अपेक्षे सह सरांना साश्रू नयनांनी माझी ही शब्दांजली अर्पण करतो व येथेच थांबतो. प्रा.डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता. मुखेड जी. नांदेड
भ्रमणध्वनी – ९४२३४३७२१५