डॉ. दीपक सोमवंशी निर्मित “आय वॉन्ट चेंज” प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी शॉर्ट फिल्म

डॉ. दीपक सोमवंशी निर्मित "आय वॉन्ट चेंज" प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी शॉर्ट फिल्म
सध्या प्रभावशाली चित्रपट निर्माणच होत नाहीत. अशी ओरड प्रेक्षक करत असतात, मात्र हळूहळू या क्षेत्रात ग्रामीण भागातील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार देखील आपला प्रभाव दाखवू लागले आहेत. नुकतेच दत्ताजी उदगीरकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि लेखन केलेला तथा उदगीर येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणारे वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नाव डॉ. दीपक सोमवंशी यांच्या दीपज्योती फिल्म्स यांनी प्रस्तुत केलेली “आय वॉन्ट चेंज” ही कलाकृती प्रेक्षकांच्या काळजावर आपला वेगळा ठसा उमटवत आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
उदगीर पंचक्रोशीतील कलाकारांना सोबत घेऊन दत्ताजी उदगीरकर यांनी ही शॉर्ट फिल्म बनवली आहे. या लघु चित्रपटांमध्ये डॉ. केरबा कांबळे, प्रणिती संगमे, अंकिता मादळे, सविता मलकापूरे, अक्षय बिरादार, स्नेहा पटवारी, वैष्णवी पटवारी, राम संगमे, शेषराव फावडे, डॉ. संजय शिंदे, अनंत कदम यांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटाची निर्मिती डॉ. दीपक सोमवंशी यांनी केली आहे. संपादन विठ्ठल वाघमारे यांचे असून कार्यकारी निर्माता म्हणून शेषराव फावडे आणि चंद्रकांत मादळे यांनी काम पाहिले आहे.
“आय वॉन्ट चेंज” अर्थात “मला बदल हवा आहे” ही शॉर्ट फिल्म निश्चितपणे संवेदनशील माणसाच्या मनामध्ये वैचारिक क्रांतीचे बीजारोपण करेल, अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. समाज व्यवस्थेमध्ये सध्या चालू असलेली अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा त्यांना मूठ माती देण्याचा प्रयत्न करावा म्हणून निश्चितच या लघु फिल्म मध्ये प्रयत्न झाले आहेत. उघडपणे आम्ही बेंबीच्या देठापासून समतेच्या गप्पा जरी मारत असलो तरी, देखील समाज व्यवस्थेमध्ये भेदाभेद मोठ्या प्रमाणात आहेत. गरीब आणि श्रीमंत ही दरी जशी आहे, तशीच चातुर्वर्ण व्यवस्थेचे पडसाद देखील आजही समाजामध्ये पाहायला मिळतात. सर्वसामान्य माणसाला आपल्या पाल्यांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे, इंग्रजी माध्यमाचे फॅड जे आता रुजू पाहत आहे, त्यादृष्टीने गरिबांनी जर आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकवावी म्हटले तर त्या पालकाची आणि पाडल्याची होणारी होरपळ इथे पाहायला मिळते. शिक्षणाने आपण मोठे व्हावे असे गरिबांना जरी वाटत असले तरी शिक्षणाचे झालेले बाजारीकरण, समाज व्यवस्थेने घालून दिलेला पायंडा आणि पावलोपावली गोरगरिबांच्या आशा, अपेक्षांची होणारी होळी हे चित्रण करत असताना एका बालकलाकाराला केंद्रबिंदू ठरवून या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या शॉर्ट फिल्मची नायिका अर्थात बालकलाकार, तिला मोठमोठी स्वप्न पाहायची आहेत, ती साकार करायची आहेत, परंतु पावलोपावली होणारी तिची अवहेलना, दारिद्र्यामुळे घरातून मिळणारी वागणूक, शाळेत तिच्याकडे तुच्छतेने पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वच बाबी चित्रीकरण करत असताना निर्माते आणि दिग्दर्शक यांनी अत्यंत बारकाईने टिपलेले आहेत. त्यामुळेच ही फिल्म हृदयस्पर्शी झाली आहे. अत्यंत भावस्पर्शी बनलेले या कलाकृतीमध्ये विद्यार्थिनीच्या मनाला, महत्वकांक्षेला बसणारे हादरे यांचे अत्यंत भावस्पर्शी चित्रण दत्ताजी उदगीरकर यांनी कौशल्य पणाला लावून सादर केले आहे.
समाज व्यवस्थेत एखाद्या मुलीची होणारी कुचंबना आणि अवहेलना अत्यंत ताकतीने त्यांनी रेखाटली आहे. आणि ती पडद्यावर देखील साकारण्यात यशस्वी झाले आहेत. ग्रामीण भाग तसा कलाक्षेत्राच्या दृष्टीने उपेक्षित असला तरी अस्सल मातीतील कलागुण कसे असतात? हे प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न चिमुरडीची भूमिका बजावणाऱ्या मुलीने खूपच प्रभावशाली पणे दाखवले आहेत.
सामान्यतः समाजामध्ये असे म्हटले जाते की, “कीर्तनाने समाज सुधारत नसतो, किंवा तमाशाने समाज बिघडत नसतो”
काही दृष्टी हे सत्य असले तरीही समाज व्यवस्थेला उलथून टाकण्याची ताकद साहित्यात, कलाकृतीत असते. याची साक्ष इतिहास देतो. केवळ सामाजिक बदलावच नाही तर, सत्ता उलथून टाकण्याची ताकद देखील लेखणीमध्ये असते. हे जहाल मतवादी नेते लोकमान्य टिळकांनी केसरीच्या माध्यमातून दाखवून दिले होते. तोच पायंडा समाजामध्ये रुजवण्यासाठी विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दृष्टीने मुर्दाड बनलेल्या समाज व्यवस्थेला संवेदनशील बनवण्याच्या दृष्टीने निश्चितपणे ही कलाकृती काम करेल. “आय वॉन्ट चेंज” ही त्या चिमुकलीची समाजव्यवस्था बदलाची हाक काळजाला भिडणारी आहे. त्याची मुकलीचा कोणताही दोष नसताना, काय म्हणून तिने समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे? का म्हणून तिला हक्कापासून दूर ठेवण्याचा अट्टाहास केला जातो? प्रेक्षकांना या गोष्टीचे आत्मचिंतन करायला ही कलाकृती भाग पाडते.
या लघु चित्रपटातील कलाकार उदगीर पंचक्रोशीतील असल्यामुळे तसेच ही कलाकृती ही याच पंचक्रोशीत बनली गेल्यामुळे ती प्रेक्षकांना आपलीशी वाटणे स्वाभाविक आहे. कदाचित त्यामुळेही असेल, ही कलाकृती प्रभावशाली ठरू लागली आहे. एका चिमुरडीच्या भूमिकेभोवती कथानक फिरत असले तरी, तितक्याच प्रभावीपणे तिने आपली भूमिका निभावली आहे. समाजामध्ये चालू असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याला तिलांजली देऊन काहीतरी चांगले करावे , नवीन घडवून आणावे. अशी तळमळ या फिल्मच्या निर्मितीमागे असावी. असे प्रमाणिक मत ही शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर वाटायला लागते. असे प्रेक्षक बोलत आहेत
तसा अनुभव अनेकांनी बोलूनही दाखवला आहे. अत्यंत कमी वेळामध्ये प्रभावशाली विषय मांडण्याची हातोटी दत्ताजी उदगीरकर यांनी दाखवून दिली आहे. कमी शब्दात, कमी वेळात मोठा विषय आणि मोठा आशय मांडण्याची कला फार कमी लोकाकडे असते. मात्र ही कलाकृती पाहिल्यानंतर या कलाकृतीमध्ये सहभागी असलेले कलाकार आणि ही कलाकृती सादर करण्यासाठी पडद्यामागून भूमिका बजावणारे डॉ. दीपक सोमवंशी असतील दत्ताजी उदगीरकर असतील किंवा दीपज्योती फिल्मच्या माध्यमातून काम करणारे इतर सहकारी मित्र असतील, निश्चितपणे एक उत्कृष्ट प्रयत्न त्यांनी केला आहे. हे नमूद करावेच लागेल! तसेच अशा पद्धतीचा प्रयत्न करणाऱ्यांना उदगीर परिसरातील प्रेक्षकांनी निश्चित साथ देणे गरजेचे आहे. असेही जाणकार प्रेक्षक बोलू लागले आहेत. या शॉर्ट फिल्म मुळे किमान एक वैचारिक क्रांतीची चर्चा सुरू झाली आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
ॲड. एल.पी.उगीले
सहकार्य: श्रीधर सावळे