कोविडमुळे कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी उपक्रम हाती घ्यावा – पालकमंत्री अमित देशमुख

कोविडमुळे कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी उपक्रम हाती घ्यावा - पालकमंत्री अमित देशमुख

जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात एप्रिल 2020 पासून कोरोना बाधित रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली होती. आज रोजी पर्यंत 699 रुग्णांचे मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. तरी कोरोना महामारी मुळे एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालेला असेल तर त्या कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी शासन व सामाजिक संस्थांची आहे. यासाठी प्रशासनाने व सामाजिक संस्थांनी अशा कुटुंबाची माहिती घेऊन त्या कुटुंबाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम हाती घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित covid-19 च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सूळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे व इतर सर्व संबंधित विभाग प्रमुख व कोरोना टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात कोरोना महामारी मुळे ज्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे मृत्यू झालेले आहेत त्या बाबतची माहिती घ्यावी व त्या कुटुंबाला सावरण्यासाठी शासनाबरोबरच सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. यासाठी प्रशासनाने एक उपक्रम हाती घेऊन त्या कुटुंबांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाची आजपर्यंतची जी आकडेवारी सादर केलेली आहे; त्यानुसार लातूर जिल्ह्यात सद्यस्थितीत लॉकडाऊन ची आवश्यकता नाही. परंतु कालच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर पाळणे व सॅनिटीझर चा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना व आदेश जारी केले असून त्याचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे असे आवाहन ही त्यांनी केले.
राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. ही परिस्थिती आपल्या लातूर जिल्ह्यात येऊ नये म्हणून नागरिकांनी शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार नाही यासाठी स्वतःहून काळजी घ्यावी. शासन व प्रशासन सोबत आहे व नुकतेच लसीकरणाची मोहीम सुरू आहे. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही परंतु नागरिकांनी योग्य ती दक्षता घेऊन कोरूना ला दूर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत पालकमंत्री देशमुख यांनी मांडले.
जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा एक भाग म्हणून रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करावे की नको या बाबतचा एक अहवाल तयार करावा. तसेच जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आस्थापनाच्या कामाच्या वेळेत बदल करून गर्दी नियंत्रण करता येईल का याबाबतही विचार करावा. तसेच लातूर महापालिकेने व्यापारी व्यावसायिक यांच्याशी कामाच्या वेळेत बदल करण्याबाबत चर्चा करावी अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्या.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा राज्याचा सरासरी मृत्यूदर हा 2.5 इतका असून लातूर जिल्ह्याचा मृत्यूदर हा 2.8 इतका आहे. तर हा मृत्यु दर कमी करण्याबाबत जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात व मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच खाजगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या रोजच्यारोज घेतली गेली पाहिजे असेही पालकमंत्री देशमुख यांनी निर्देशित केले. लातूर जिल्हा प्रशासनाने सुरुवातीच्या काळापासून ते आजपर्यंत कोरोना नियंत्रणासाठी कौतुकास्पद काम केलेले आहे. तसेच सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेबद्दल ही आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले की, माहे जुलै 2020 व ऑक्टोबर 2020 या काळात कोरोनामुळे अधिक मृत्यू झाले; परंतु नंतर परिस्थिती नियंत्रणात आणून अधिक काटेकोरपणे उपाययोजना राबविल्या जात असून जिल्ह्याचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच सद्यस्थितीत एका रुग्णाच्या मागे वीस लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत तर हेच प्रमाण पुढील काळात प्रति रुग्णामागे तीस लोकांच्या चाचण्या करण्यात येऊन दिवसाला दीड ते दोन हजार पर्यंत चाचण्यांची संख्या वाढवली जाणार असून सद्यस्थितीत लॉक डाऊन ची आवश्यकता नाही व प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध उपाययोजना राबविल्या जात असून ग्रामीण भागातील कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस प्रशासन अंमलबजावणी करत असून जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे व पोलीसाच्या कारवाई आणि कोरोना पासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लातूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनीही मार्गदर्शनपर सूचना दिल्या.

प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे यांनी जिल्ह्यात कोरोना ची परिस्थिती नियंत्रणात असून आज रोजी ऍक्टिव्ह केसेसची संख्या 346 इतकी आहे. तर आजपर्यंत 699 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. चार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरदास यांनी आरोग्य विभागाने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली व कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आरोग्य प्रशासन तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तर डॉक्टर बरुरे यांनी जिल्ह्यात लसीकरणाचा पहिला टप्पा संपला असून त्यात 58% लसीकरण झालेले असून दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण ही 35 टक्केपर्यंत झाल्याची माहिती यावेळी दिली.

About The Author