शिवचरित्र म्हणजे संस्काराचे दालन होय – विवेक सौताडेकर
लातूर (प्रतिनिधी) : शिवचरित्र हे विद्यार्थी,शिक्षक तसेच समाजातील सर्व घटकांनी अभ्यासणे गरजेचे आहे. मातृभक्ती, पितृभक्ती, मातृप्रेम, कुटुंब वात्सल्य, त्याग, स्फूर्ती ,राष्ट्रभक्ती, पराक्रम , दृढनिश्चय ,परिश्रम, दूरदृष्टी, अभ्यास, उत्तम नियोजन, प्रशासन व्यवस्था, युद्धकौशल्य, संघटन, परधर्म सहिष्णुत ,उत्तम चारित्र्य,समयसूचकता, न्यायवृत्ती या सर्व गोष्टींचे संस्कार हे शिवचरित्रातून होतात असे नव्हे तर शिवचरित्र हेच संस्काराचे दालन आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक तथा साहित्यिक विवेक सौताडेकर यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळवटी या ठिकाणी शिवजयंती निमित्ताने शिवचरित्रातून विद्यार्थ्यांनी काय घ्यावे, या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव साखरे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दिनेश भिसे,ब्रिजलाल कदम,कवी रामकृष्ण बैले हे उपस्थित होते. सौताडेकर पुढे म्हणाले की, स्वबळावर स्वतंत्र स्वराज्याची निर्मिती करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. सातत्याने टेन्शन घेणार्या व दिशाहीन झालेल्या विद्यार्थ्यांना शिवचरित्रात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शिवाय उत्तम नियोजन कसे करावे व भविष्याचा वेध कसा घ्यावा हे शिवचरित्रातून शिकायला हवे तरच जीवनात यशस्वी होता येईल असेही ते म्हणाले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.विदयार्थ्यांनी पोवाडा, गीते गायली.ब्रिजलाल कदम व दिनेश भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या शाळेतील अकरा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप शिवाजीराव साखरे यांनी केला.कर्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर सूर्यवंशी यांनी केले व आभार शिवाजी पेंडालवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मस्के, सोलापूरे,शेख, पाटील आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.