अवैद्य धंद्याचे माहेरघर औराद शहाजानी!!
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात येणारे औराद शहाजानी पोलीस स्टेशन हे अवैद्य धंद्याचे माहेरघर बनले आहे. कर्नाटक राज्यातून मटका, जुगार खेळणारे महाराष्ट्राच्या या सीमावर्ती भागात येऊन मोठ्या प्रमाणात मटका खेळतात, जुगार खेळतात त्यासोबतच महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटका आणि सुगंधी तंबाखू यांची वाहतूक कर्नाटक राज्यातून औराद शहाजानी येथे येऊन तेथून लातूर जिल्ह्यात अंधाराचा फायदा घेऊन परस्पर वितरीत केली जाते. वास्तविक पाहता या गोष्टीची माहिती पोलीस प्रशासनाला असूनही त्याकडे पोलिस प्रशासन कानाडोळा करत आहेत. या सीमावर्ती भागात होत असलेल्या या अवैध धंद्याच्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाला ही माहिती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र असे असले तरीही या भागात धाडसत्र का राबवले जात नाही? हाही प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो आहे. अवैध धंद्या मुळे सर्वसामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे ताबडतोब या अवैध धंद्याला वेसण घातली जावी. अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. अवैद्य पद्धतीने चालू असलेला मटका, गुटखा, सुगंधी जर्दा आणि जुगार थांबवण्याची ही मागणी अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी केली आहेत.