बोगस मनिऑर्डर च्या नावावर लाखोंचा अफरातफर
महागाव च्या उप डाकपालावर गुन्हा दाखल
महागांव (प्रतिनिधी) : जनतेच्या नावाने बनावट मनिऑर्डर पाठवुन त्या पैश्याचा आपणच खरा लाभार्थी बनुन लाखो रूपयांचा अपहार उप डाकपालाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महागांव येथील पोस्ट ऑफिस मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ४६० बोगस मनीऑर्डर तयार करून लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आला. महागांव उप डाकघरात वर्षभरापुर्वी तत्कालीन उप डाकपाल गजानन घोड़े याने हा कारनामा केल्याचे उघड झाल्यानंतर पोस्ट खात्यात खळबळ उडाली आहे. आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. २८ मार्च २०२० च्या दरम्यान उप डाकपाल गजानन घोड़े याने बनावट ग्राहकांच्या नावाने ४६० मनीऑर्डर पाठविल्याचे दाखवून पोस्ट खात्यातून २४ लाख १५हजारपेक्षा अधिक रकमेचा अपहार केला. या बोगस मनिऑर्डर घोटाळ्याची लेखा परीक्षणात कुणकुण लागल्यानंतर वरिष्ठांनी चौकशी सुरू केली. सुरुवातीला काही हजारो रुपयांचा वाटणारा हा घोटाळा २४ लाखापर्यंत पोहोचला. या घोटाळ्यात आणखी एका कर्मचाऱ्याचे नाव पुढे येत असून त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.या प्रकरणाची सखोल व निःपक्ष चौकशी झाल्यास या लाखो रुपयांच्या अफरातफरीमध्ये पोस्ट विभागातील मोठमोठया अधिकाऱ्यांनी सुद्धा आपले उखळ पांढरे करून घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही . या घोटाळ्याचा मास्टरमाइंड असलेल्या गजानन घोडे विरोधात महागाव पोलिसांनी भादवी ४०९, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
चौकट
बोगस मनिऑर्डर करून लाखो रुपयांचा गंडा घालणारा उप डाकपाल गजानन घोडे का कायमच वादग्रस्त राहिला आहे .पोस्टात आलेल्या ग्राहकांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून विनाकारण वाद घालणे ,कर्तव्यात हयगय व मनमानी करणे हा त्याचा नित्यक्रमच होता प्रसंगी वरिष्ठांशी सुद्धा तो अरेरावी करून हमरीतुमरीवर येत असल्याची माहिती आहे.