26 गावातील शिक्षकांच्या मतदानाचा प्रश्न कायम?
उदगीर (एल. पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या 18 तारखेला होणार आहेत. नेहमीप्रमाणे याही निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेमध्ये शिक्षकांना सामावून घेण्यात आले आहे. ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेमध्ये पोस्टल बॅलेट पत्रिकेची सुविधा नसते. त्यामुळे या 26 गावातील ज्या शिक्षकांना मतदान प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही की काय? असा प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षक संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचे कर्तव्य हे पवित्र मानले जाते.
प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. यासाठी राज्यघटनेमधून विशेष तरतूद करण्यात आली असून मतदान जनजागृती करून प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवलेले आहेत. या जनजागृतीच्या मोहिमेतही बऱ्याच अंशी शिक्षकांचा सहभाग आहे. असे असले तरीही या 26 गावातील शिक्षक ज्यांचा समावेश मतदान प्रक्रियेसाठी करण्यात आलेला आहे, त्या शिक्षकांना प्रत्यक्ष मतदान करता येणार नाही की नाही? असा प्रश्न निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. कारण शिक्षक हा घरातील कर्ता पुरुष असल्याने घरातील वयोवृद्ध आई-वडील, महिला यांचे मतदान करून घेणे या दृष्टीने शिक्षक प्रयत्नशील असतात. मात्र त्यांचीच निवड या प्रक्रियेमध्ये दुसऱ्या गावात झाली तर ते आदल्याच दिवशी मतदान केंद्रावर जातील. परिणामतः त्या शिक्षकांना स्वतःचे मतदान करता येणार नाही, आणि आपल्या घरच्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नही करता येणार नाहीत. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे पदाधिकारी रवीकिरण बलुले, सर्जेराव भांगे, निळकंठ पाटील, बालाजी भांगे, लक्ष्मणराव दाबके, बालाजी बरुरे, अरविंद धनुरे, विजयकुमार गबाळे, चंद्रकांत कांबळे, मनोज मुंडे, धर्मेंद्र गडमवार, मार्गेपवार लक्ष्मण, बालाजी गारमपल्ले त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्याचे ठरवले आहे. उदगीर तालुक्यातील या 26 गावाव्यतिरिक्त ज्या गावातील शिक्षकांना मतदानाच्या ड्युटी नाहीत, त्यांना ड्युटी दिली जावी, किंवा या शिक्षकांना पोस्टल बॅलेट ची व्यवस्था करून द्यावी. अशी आग्रही मागणी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे. वास्तविक पाहता या प्रक्रियेला पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याने थोडासा उशीर झाला असला तरीही पर्यायी शिक्षक व इतर कर्मचारी, इतर गावातील शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश या प्रक्रियेत केल्यास लोकशाहीचा हक्क शिक्षकांना चांगल्या पद्धतीने बजावता येईल. तसेच आपल्या घरातील सर्वांचे मतदान करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील, असा सकारात्मक विचारही या नेतेमंडळींनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडला आहे.
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतच्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या असतात. निवडणूक जितकी लहान तितके प्रत्येक मताला महत्त्व जास्त असते. चुरसही तितकीच जास्त असते. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला मतदानाचा विषय विचारात घेऊन या 26 गावातील शिक्षकांना विशेष बाब म्हणून मतदान प्रक्रियेतून वगळावे, आणि इतर गावातील शिक्षकांना सामावून घ्यावे. अशीही विनंती केली जात आहे. इतर गावांची जेव्हा निवडणूक असेल, त्यावेळेस या 26 गावातील शिक्षकांना प्राधान्याने निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावे. त्यावेळी यांची कोणतीही अडचण असणार नाही. असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
