अँटीकरप्शनचा गुन्हा उच्च न्यायालयातून रद्द,तत्कालीन गटविकास अधिकारी श्री.अंकुश चव्हाण निर्दोष
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील तत्कालीन गटविकास अधिकारी अंकुशराव चव्हाण यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हा नोंदणीलाच अंकुश चव्हाण यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देऊन याचिका दाखल केली होती, सुनावणी अंती अंकुश चव्हाण यांच्या विरोधातील एफ आय आर रद्द करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की 15 जुलै 2020 रोजी पंचायत समिती उदगीर येथील काही पदाधिकाऱ्यांनी अंकुश चव्हाण (तत्कालीन गट विकास अधिकारी उदगीर) यांच्याविरुद्ध तक्रारदार नामदेव भोसले सरपंच पती कुमुदाळ (हेर) यांना पुढे करून अँटीकरप्शन चा गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्हा खोटा असल्याचे सांगून याचिका दाखल केली होती. अंकुश चव्हाण यांना यापूर्वीच उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला होता.
याच प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याने उच्च न्यायालयात न्याय मिळावा म्हणून धाव घेतली होती. त्या प्रकरणात अखेर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद ने अँटी करप्शनचा गुन्हाच खोटा आहे, असे ताशेरे ओढून उदगीर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविलेला संबंधित गुन्हाच रद्द केला. यामुळे उदगीर तालुक्यातील कर्मचारी व नागरिकांमध्ये “सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाहीl” अशी चर्चा होत आहे.
