नवनिर्वाचित सिनेट सदस्य डॉ.विष्णू पवार यांचा सत्कार

नवनिर्वाचित सिनेट सदस्य डॉ.विष्णू पवार यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधीसभा ( सिनेट ) 2022 च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून ग्रंथपाल डॉ.विष्णू पवार यांचा घनघवीत विजय झाला. विशेष म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात यापूर्वी ग्रंथपाल या पदासाठी निवडणूक लढविण्याचा अधिकार नव्हता. कोर्टाच्या माध्यमातून विष्णू पवार यांनी सर्वप्रथम तो अधिकार मिळवला आणि निवडणूक लढवली .त्यामध्ये त्यांनी हे यश संपादन केले. पहिला लढा त्यांनी कोर्टातून जिंकल्यामुळे विद्यापीठातील प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्यांचे नाव त्यांनी पोहोचवलेले होते आणि त्यानंतर निवडणूक लढवून यश संपादन करून परत आपल्या नावाचा गवगवा सर्व दूर पसरविलेला आहे. डॉ.विष्णू पवार यांनी निवडणुकीच्या माध्यमातून विजय मिळविल्यानंतर शिवाजी महाविद्यालय व सामाजिक स्तरावरील विविध घटकाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायक जाधव तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे कोषाध्यक्ष नामदेव चामले ,डॉ ए एम पाटील, डॉ ए आर पाटील ,डॉ मल्लेश झुंगा स्वामी, उपप्राचार्य डॉ. एस व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे, पर्यवेक्षक जी जी सूर्यवंशी यांची होती. महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा बांधून प्राचार्य डॉ विनायक जाधव, कोषाध्यक्ष नामदेव चामले व इतर मान्यवरांच्या हस्ते पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने मल्लेश झुंगास्वामी यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच सेवानिवृत्त प्राध्यापकातून डॉ ए एम पाटील,डॉ. ए आर पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच समाजातील विविध घटकातील मान्यवरांकडून पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देत असताना डॉ विष्णू पवार म्हणाले मी ही निवडणूक जिंकलेली नसून आपण ती सर्वांनी जिंकलेली आहे. आपण सर्वांनी मला चांगली साथ दिल्यामुळेच मला यश संपादन करता आलेले आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहील. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले महाविद्यालयाचा प्रतिनिधी विद्यापीठात गेलेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यापासून ते प्राध्यापकापर्यंत सर्वांच्याच अडचणीची सोडवणूक करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी डॉ डी बी कोनाळे यांनी तर आभार प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!