जिवंत आईला समाज माध्यमावर वाहतो श्रद्धांजली !!
विकृतबुद्धी उडवतो पोलिसांचीच खिल्ली !!!
उदगीर (एल. पी. उगिले) : कधी कधी माणसाची विकृत बुद्धी कोणत्या टोकाला जाईल, हे सांगता येत नाही. साधारणतः ग्रामीण भागात असे म्हणतात की, “जर, जरा, जमीन भांडणाचे कारण तीन” याप्रमाणेच आपल्या सख्या भावासोबत वाद घालून आईला मारहाण करणाऱ्या वडिलांची साथ देत आपल्या जिवंत आईला श्रद्धांजली अर्पण करणारा महाभाग उदगीर तालुक्यातील शिरोळ (जानापुर) येथे पाहायला मिळतो. समाज माध्यमाचा उपयोग कोणत्या चांगल्या कामासाठी न करता अशा विकृत प्रवृत्तीला काय म्हणावे?
घरोघरी मातीच्या चुली म्हणतात, त्याप्रमाणे पती-पत्नीचे भांडण, वाद या गोष्टी काही नवीन नाहीत, मात्र जेव्हा वय झालेले असते. त्यावेळेस तरी किमान सामंजस्याने संसार चालवावा. अशी अपेक्षा असते. मात्र कधी कधी मन मानेल तसे वागणाऱ्या माणसाला आपल्या मनाविरुद्ध झालेली गोष्ट सहन होत नाही, आणि मग तो आक्रमक बनतो. काहीसा असाच प्रकार या प्रकरणात देखील पाहायला मिळतो.
उदगीर येथील शासकीय रुग्णालयात वार्ड क्रमांक चार मधील बेड क्रमांक 23 वर उपचार घेत असलेल्या मिनाबाई यशवंतराव जवळगे (वय 50 वर्ष) यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना फिर्याद दिली की, दिनांक दहा सप्टेंबर रोजी आपले पती यशवंतराव जवळगे हे आपल्या बाळकृष्ण यशवंत जवळगे या नोकरीवर असलेल्या मुलाला शिवीगाळ करत होते. तेव्हा तो नोकरीवर आहे, दूर आहे. त्याला अशा पद्धतीची शिवीगाळ करणे योग्य नाही. असे सांगण्याचा प्रयत्न त्या मुलाची आई, अर्थात मिनाबाई जवळगे यांनी केली. तेव्हा यशवंतराव जवळगे यांना प्रचंड राग आला. आणि त्यांनी आपल्या पत्नीचे, आपले वय न पाहता तिला लाथा, बुक्क्यांनी पाठीवर, तोंडावर, पोटावर जबर मारहाण केली. ज्यामुळे मिनाबाई यांना शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले.
शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एम एल सी क्रमांक 746/ 22 प्रमाणे दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी तक्रार नोंदवून उदगीर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना उदगीर ग्रामीण पोलिसात वेळोवेळी बोलावून आपल्या विरुद्ध कलम 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला असून त्या संदर्भात आपले म्हणणे मांडावे. व या प्रकरणात जामीन करून घ्यावी. अशा पद्धतीच्या सूचना पाठवल्या. मात्र पोलिसांच्या या सूचनांना न जुमानता मनमानी करणाऱ्या यशवंतराव जवळगे आणि त्यांचा मुलगा यांना सदरील बीटचे पोलीस जमादार रंगवाळ यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणले, आणि हा घरातील मामला आहे, घरातल्या घरात मिटवावा. असा सल्ला दिला. मात्र पोलिसांनी आपल्या भानगडीत पडू नये, अशी प्रवृत्ती निर्माण झालेली असल्यामुळे आणि याप्रकरणी दुसऱ्या मुलाने पोलिसांना सांगितले की, आपला भाऊ समाज माध्यमावर आपल्या जिवंत आईचा फोटो लावून भावपूर्ण श्रद्धांजली असा स्टेटस ठेवत आहे. त्यामुळे त्यांचा उद्देश चांगला दिसत नाही, असे सांगताच पोलिस आता आपल्या विरुद्ध काहीतरी गंभीर स्वरूपाची कारवाई करणार, अशी भीती वाटल्याने की काय ? गावी राहणाऱ्या यशवंतराव जवळगे आणि त्यांचा मुलगा मारुती जवळगे यांनी काही पत्रकारांना वस्तुस्थिती न सांगता किंवा आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, याची माहिती न देता पोलिसांनी आपल्याला मारहाण केली. आपल्याकडून पैसे घेतले, अशी माहिती देऊन दिशाभूल केली. आणि पोलिसांचीच खिल्ली उडवली. “सत्य परेशान होता है, पराजित नही” असे म्हणतात. त्याप्रमाणे या प्रकरणातील सत्य काय आहे? हे इतर पत्रकारांनी माहिती घेतली असता लगेच समोर आले. आणि पोलिसावर आरोप करणारेच तोंडघशी पडले!!
