पतंजली योग समिती विद्यमाने भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये योगा वर्गाचे उद्घाटन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील पतंजली योग समितीच्या वतीने भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये योगाच्या नित्य वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या वर्गाचे उद्घाटन झाले.सुरुवातीला नरेंद्र यंदे यांनी योग शिबिराचे संचलन केले आणि वीरभद्र कप्पिकेरे यांनी प्राणायाम व योगासनाचे प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवले.
त्यानंतर या नित्ययोग वर्गाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवमूर्ती आप्पा भातांबरे हे ज्येष्ठ योग शिक्षक म्हणून उपस्थित होते, तर त्याच बरोबर भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाचे मालक अशोकराव आचारे आणि किशनराव जाधव या दोघांनी प्रमुख पाहुण्याचे पद भूषवले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम चामले यांनी केले. आकनगीरे सुरेंद्र यानी या नित्य योग वर्गाची कारणे व उद्देश सांगितला. त्यानंतर महिला आघाडी पतंजली योग समितीच्या प्रभारी असलेल्या सौ. मीनाक्षीताई स्वामी यांची केंद्रीय कार्यकारिणीने लातूर जिल्हा अध्यक्षपदी महिला प्रभारी म्हणून नेमणूक केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सुमतीताई भातांब्रे यांची पतंजली योग समिती उदगीर महिला प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. त्याशिवाय शेगाव येथील योग शिबिरामध्ये व योग विषयक बैठकीमध्ये स्वामी परमार्थ देवजी यांच्या शिबिरात एक दिवशीय सहभाग घेतल्याबद्दल प्रा. श्रीराम चामले व वीरभद्र कप्पिकेरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.त्याशिवाय पतंजलीच्या सौ. उमादेवी शिरगिरे, वीरभद्र कापिकेरे व राम राजे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्याशिवाय पतंजलीचे योग साधक नरेंद्र शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. मधुमिताताई शिंदे यांच्या इशोपनिषद व सुभाषितस्तबक या दोन ग्रंथाचे लिखाण केल्याबद्दल त्यांचाही पतंजलीच्या मार्फत सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष समारोप करताना शिवमुर्तीअप्पा भातांब्रे यांनी योगाचे महत्त्व विशद करून योगामध्ये सातत्य ठेवले तरच अपेक्षित यश मिळू शकते, याबद्दल त्यांनी आपले मत या ठिकाणी मांडले. सर्वांनी योगाची कास धरावी, आपण सर्वजण रोगमुक्त समाज निर्माण करू या, असे आवाहन त्याने उपस्थित केले. याप्रसंगी उमाकांत अंबेसंगे, नरेंद्र येन्दे, नरेंद्र शिंदे, शिवलिंग मठपती, सोनटक्के चंद्रकांत , हनुमंतराव शेळके, रामराजे औराद्दे, हणंमतराव आप्पा, नारायणराव भोसले, उदबाळे व परिसरातील अनेक नागरिक, योग प्रेमी, योग साधक उपस्थित होते. प्रा चामले श्रीराम यांनी आभार प्रदर्शन केले.
