पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे (काका) यांच्या हस्ते युवराज सुभाषराव बिरादार यांचा सत्कार संपन्न

पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे (काका) यांच्या हस्ते युवराज सुभाषराव बिरादार यांचा सत्कार संपन्न

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा २०२२ या परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील सावरगाव येथील युवराज सुभाषराव बिरादार यांनी संपूर्ण देशात २५ वा क्रमांक तर महाराष्ट्रातून ०३ क्रमांक पटकावला आहे.

त्यांनी मिळविलेल्या या उज्वल आणि नेत्रदीपक यशामुळे त्यांचा पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे (काका) यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी शाल, फेटा, पेढे आणि पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी वडील सुभाषराव बिरादार, अभंगराव सूर्यवंशी, डॉ.संजय गवई, विठ्ठलराव सूरे, वरुणराज सूर्यवंशी, पत्रकार रणदिवे लक्ष्मण ,ईश्वर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवराज सुभाषराव बिरादार हे ग्रामीण भागातील विद्यार्थी असून आईच्या मायेचे छत्र बालपणीच हरविल्या गेले. त्यांचे वडील शिक्षक असुन नुकतेच ते मुख्याध्यापक म्हणून ३३ वर्ष सेवा करून निवृत्त झाले आहेत.

युवराज बिरादार यांनी योगेश्वरी आणि विवेकवर्धणी विद्यालय, देवणी येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, असून सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण लातूर येथील नवोदय विद्यालय येथे झाले. एच.एस.सी.मध्ये ७९.६० गुण मिळवून त्यांनी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई येथे एम.टेक.पूर्ण केले. त्यानंतर २०१९ पासून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी या परीक्षेमध्ये नुकतेच उज्ज्वल यश संपादन केले आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अशोक कुकडे (काका) म्हणाले की, या परीक्षेमध्ये आपण मिळवलेले यश हे अतुलनीय आहे. आपल्याला मिळालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कार्याच्या संधीचे आपण सोने केले पाहिजे, आणि आपण प्रामाणिकपणे कार्य करून लोकांची सेवा केली पाहिजे. असे त्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सत्कार मूर्ती युवराज बिरादार म्हणाले की, बालपणापासूनच आई-वडीलांचे सातत्याने वर्ग एक अधिकारी बनण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. आणि त्यादृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करीत गेलो, आणि आज मला मेहनत आणि जिद्दीच्या बळावरच हे यश मिळाले आहे. यासाठी माझे वडिल व बहिणींचे खूप मोठे श्रेय आहे. मी नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भारतीय सेवेमध्ये माझ्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवेन आणि आपला विश्वास सार्थ ठरवेन, असे ते यावेळी म्हणाले.

About The Author