सावित्रीबाई दीन दुबळ्यांच्या आई होत्या – प्रा.ज्योती संपाळे
उदगीर (एल.पी.उगीले) : एकोणिसाव्या शतकात प्रवाहाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य केले.पक्षी जसे पिल्लांना पंखाखाली घेऊन उब देतात. पिल्लांचे संरक्षण करतात. त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी शुद्रांना,मुलींना शिक्षण देऊन त्यांना जागे करून सावध केले.आधार दिला.खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले या दीनदुबळ्यांच्या आई होत्या, असे विचार प्रा.ज्योती संपाळे यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. एन.शिंदे तर मंचावर संस्थेचे कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे व वक्त्या म्हणून इंग्रजी विभागातील प्रा.ज्योती संपाळे उपस्थित होत्या. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा.ज्योती संपाळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी वादळात न डगमगता स्थिर राहिल्या. हेच खऱ्या अर्थाने आपले ईश्वर आहेत. त्यांचा मूल्य आणि वारसा आपण जपला पाहिजे.अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. एन. शिंदे म्हणाले, क्रांतिकारी व्यक्तींचे विचार केवळ त्या काळापुरते मर्यादित नसतात, तर ते विचार व कार्य भविष्यातही आपल्याला दिशा देत असतात. सावित्रीबाई फुले यांनी जे काही कार्य केले, ते आजही आपल्याला दिशादर्शक आहे. आपण त्याचे अनुकरण केले पाहिजे.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. मनोहर भंडारे तर आभार डॉ.म.ई.तंगावार यांनी मानले.
