वंचितांबद्दल कळवळा आणि जगण्यात शील नसेल तर शिक्षण व्यर्थ आहे- ज्ञानदेव झोडगे

वंचितांबद्दल कळवळा आणि जगण्यात शील नसेल तर शिक्षण व्यर्थ आहे- ज्ञानदेव झोडगे

अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षणाने माणूस मोठा होतो ही गोष्ट खरी आहे, मात्र आपल्याजवळ वंचितांबद्दल अंतःकरणात कळवळा नसेल आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारात शील नसेल तर अशी शिक्षण व्यर्थ ठरते, असे प्रतिपादन किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ व प्रसिद्ध गणितज्ज्ञ ज्ञानदेव झोडगे यांनी केले. तालुक्यातील रुई दक्षिण येथे महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी युवक शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.

विचार पिठावर संस्थेचे सहसचिव माधवराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, जिल्हा परिषद रुई दक्षिण शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम मुकनर, उपसरपंच भीमाशंकर पाटील , ह.भ.प. विश्वनाथ पाटील, गणेश पांचाळ, प्रा. जगन्नाथ पाटील, सोपान मुलमवाड, अतुल पाटील, शेषराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री. झोडगे गुरुजी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि शारीरिक शिक्षण मिळते, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे प्रशिक्षणही अशा शिबिरांतून मिळाले पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी स्वतः दगड गोटे झेलून मुलींच्या शिक्षणाची सोय केली, हे आजच्या मुलींनी विसरता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा शैक्षणिक आदर्श घेत विद्यार्थ्यांनी बौद्धिक विकास केला पाहिजे. त्याचबरोबर शारीरिक आणि व्यक्तिमत्त्व विकासही केला पाहिजे. आपले शिक्षण राष्ट्राच्या कार्यासाठी समर्पित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, खेड्याकडे चला हा मूलमंत्र महात्मा गांधीजींनी दिला. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना आपल्या परिसरातील खेड्यापाड्यांचा आणि वाडी वस्ती तांड्यावरील गावकऱ्यांचा विकास करते. अशा शिबिरांच्या माध्यमातून गावाबद्दलची, शेतकऱ्यांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करता येते. आज खेड्यापाड्यांमध्ये प्रचंड समस्या असून , त्या सोडविण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच महात्मा फुले महाविद्यालयाच्या समीक्षा कांबळे आणि कोमल पोले या विद्यार्थिनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये सर्वप्रथम आणि सर्व तृतीय आल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी कु. गायत्री पदमपल्ले, कु.अंबिका चौधरी, उत्कृष्ट स्वयंसेवक काकनाजी सुरनर, हर्षवर्धन कदम यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. गावकऱ्यांच्या वतीने गणेश पांचाळ यांनी शिबिरार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. सूत्रसंचालन हभप डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.डी.डी.चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!