उदगीरच्या पत्रकारांनी विकासाला साथ दिली – मुन्ना पाटील
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीरच्या पत्रकारांनी सतत विकासाचे वेगवेगळे मुद्दे मांडून शहराचा विकास घडवून आणण्यासाठी आपली लेखणी झिजवली, पत्रकारिता हा समाजाचा आरसा असतो. असे म्हणतात, त्याप्रमाणे उदगीरच्या विकासाच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न वेळोवेळी मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे, हे उदगीरच्या पत्रकारांचे वैशिष्ट्य आहे. असे विचार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमाचे संयोजक सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रामराव मामा बिरादार हे होते.तर प्रमुख पाहुणे उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुभाष धनुरे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विजय राजेश्वरजी निटूरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कुणाल बागबंदे, डॉक्टर संजय बिरादार, मल्लिनाथ बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील यांनी सांगितले की, पत्रकारांनी स्पष्ट व निर्भीड लिखाण करावे. उदगीरची ही परंपरा आहे. या परंपरेला साजेशी पत्रकारिता संपूर्ण महाराष्ट्राला दिसली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, या दृष्टीनेही प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगितले.
जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय राजेश्वरजी निटुरे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की, पत्रकारिता आणि राजकारण हे एक समीकरण आहे. द्वेषा पोटी पत्रकारिता केली जाऊ नये, पत्रकारिता स्पष्ट राहावी, जेणेकरून जर कोणाची काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची त्याला संधी मिळावी, स्पष्टवक्तेपणा असावा पण पूर्वग्रह दूषित प्रवृत्ती नसावी. कर्मधर्म संयोगाने उदगीरची पत्रकारिता सकारात्मक असल्याने विकासाला प्राधान्य देते. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी पत्रकारांच्या वतीनेही विनायक चाकुरे, सचिन शिवशेट्टे, राम मोतीपोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष समारोपाच्या अनुषंगाने दर्पण दिनाच्या औचित्य आणि त्याचे महत्त्व रामराव मामा बिरादार यांनी विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पटणे यांनी तर आभार प्रदर्शन युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव कुणाल बागबंदे यांनी केले.
