शिक्षक मतदारसंघ राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धीपूर्व प्रमाणीकरण आवश्यक
लातूर (एल.पी.उगीले) : दूरचित्रवाणी वाहिन्या, रेडीओ, चित्ररथ, बल्क अथवा व्हाईस मेसेज, सिनेमागृह, सोशल मीडिया संकेतस्थळे आदी विविध माध्यमांतील राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धीपूर्व प्रमाणीकरण जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून करून घेणे उमेदवारांना बंधनकारक आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, संबंधित राजकीय पक्ष, संघटनांनी यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत.
जाहिरातीचे प्रसारणाच्या तीन दिवस अगोदर प्रसिद्धीपूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज जाहिरातीच्या दोन प्रतीतील मसुद्यासह जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तरबाजूस, लातूर या पत्त्यावर सादर करावेत. अर्जाचा विहित नमुना जिल्हा माहिती कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या मसुद्याचे समितीतील सदस्यांकडून परीक्षण होऊन त्याला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची मान्यता घेऊन दोन दिवसांत जाहिरातीचे प्रमाणपत्र संबधितांना देण्यात येईल.
टीव्ही अथवा केबल नेटवर्क किंवा रेडीओवर प्रक्षेपित करावयाच्या जाहिरातींचा व्हिडीओ, ऑडीओ त्यातील संवादासह लेखी मजकूर दोन प्रतींत द्यावा. त्याचप्रमाणे, जाहिरात तयार करावयास आलेला खर्च, जाहिरातीचा वेळ, प्रक्षेपणासाठीचा खर्च व इतर तपशीलांसह माहिती विहित अर्जात नमूद करावी, असे जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
