उदयगिरीत विविध वाङ्मय स्पर्धांचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.१४ जानेवारी २०२३ रोजी ‘आवडता लेखक/ कवी’ आणि ‘मोबाईलच्या दुनियेत ‘ या विषयांवर निबंध स्पर्धा, सोमवार दि.१६ जानेवारी २०२३ रोजी ‘आपल्या प्रिय व्यक्तीस पत्र’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा, मंगळवार दि.१७ जानेवारी २०२३ रोजी ‘विद्रोही संत तुकाराम’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वरील स्पर्धा नियोजित दिवशी सकाळी ०९:३० वाजता उदयगिरी महाविद्यालयात संपन्न होतील. वरील स्पर्धेत सर्वप्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास अनुक्रमे रुपये ५०१, ३०१, २०१ रूपये रोख परितोषिक, ग्रंथ व प्रमाणपत्र देण्यात येईल. शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, मराठी विभागप्रमुख डॉ.दीपक चिद्दरवार यांनी केले आहे.
