शाश्वत विकासासाठी नीर, नारी आणि नदीचा सन्मान आवश्यक – डॉ. राजेंद्रसिंह

शाश्वत विकासासाठी नीर, नारी आणि नदीचा सन्मान आवश्यक - डॉ. राजेंद्रसिंह

लातूर (एल.पी.उगीले) : आपली प्राचीन परंपरा नीर, नारी आणि नदीचा सन्मान करणारी होती. आपल्या या परंपरा निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या होत्या. आपल्याला पुन्हा नीर म्हणजे पाणी, नारी म्हणजे जननी आणि जीवन देणारी नदीचे संवर्धन करावे लागेल. यातूनच मानवी जीवनाचा विकास घडेल, असा विश्वास रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती, राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, मानवलोक संस्था आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समितीच्यावतीने सारसा (जि. लातूर) येथे आयोजित ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राजेंद्रसिंह बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. हे होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे मराठवाडा समन्वयक अनिकेत लोहिया, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, तहसीलदार स्वप्नील पवार, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी पी. व्ही. कांबळे, सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन सहायक शतद पुरोहित, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, सारसा येथील सरपंच ज्योती हणमंत भिसे, उपसरपंच परमेश्वर भिसे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश मौने, मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव, यावेळी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘चला नदीला जाणूया’ या अभियान राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या माध्यमातून आपल्या जीवनवाहिन्या नद्यांना अमृतवाहिनी बनविण्याचे प्रयत्न होणार असून त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल. असे अभियान राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून या अभियानाबद्दल डॉ. राजेंद्रसिंह यांनी राज्य शासनाचे आभार मानले. राज्यात सध्या 109 जलसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नदी ही आपली जीवनदायिनी असून तिचे स्वास्थ बिघडले, तर आपणही निरोगी राहू शकणार नाही. त्यामुळे प्रत्यकाने आपली जबाबदारी ओळखून नदीच्या संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी काम करावे. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या नद्याच भूगर्भातील जलप्रवाह निर्माण करतात. त्यामुळे आपल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत जपण्यासाठी नदीची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानात शासनासोबतच लोकांचाही तितकाच सहभाग आवश्यक आहे. शासन आणि जनता यांनी येवून हे अभियान राबविल्यास दुषित होत असलेली नदी पुन्हा अमृतवाहिनी बनेल, असे डॉ. राजेंद्रसिंह यावेळी म्हणाले.

‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जलसंवाद यात्रा मांजरा नदीच्या दोन्हीकाठावरील गावांमध्ये जाणार असून यामाध्यमातून नदीच्या प्रदूषणाची कारणे, या गावांमधील लोकांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. मानवनिर्मित कारणांमुळे होणारे नदी प्रदूषण कमी होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘चला जाणूया नदीला’ अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून या अभियानाला लोकचळवळ बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदी काठांवरील गावांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. गावातील घनकचरा, सांडपाणी नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणीही प्रदूषित होते. त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर, शेतीवर होत असतात. त्यामुळे गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून 30 टक्के निधी ठेवण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.

जमिनीवरील वृक्ष, मातीत मिसळणारी सेंद्रिय द्रव्ये यावरच मातीची जलधारण अवलंबून असते. त्यामुळे नदी आणि जलस्त्रोतांचे संवर्धन होण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी फळबाग लागवड आणि आर्थिक उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची शेतजमिनीवर लागवड करणे उपयुक्त ठरेल, असे मत कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन सहायक शतद पुरोहित यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात श्री. लोहिया यांनी मांजरा नदी जलसंवाद यात्रेच्या आयोजनाची माहिती दिली. नदी ही आपली माता असून तिच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी प्रदूषणाची कारणे जाणून घेण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

About The Author

error: Content is protected !!