कुटुंबातली स्त्री सुदृढ असेल तर कुटुंब सुदढ असते – डॉ. मनकर्णा चिवडे पाटील
महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थ्यांनींचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, स्त्री आरोग्य संपन्न असेल तरच तिचं कुटुंब सुदृढ आणि आरोग्य संपन्न राहते म्हणून स्त्रियांनी सर्व प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच कुटुंब प्रमुखानीही घरातील स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन अहमदपूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मनकर्णा चिवडे पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराप्रसंगी ‘ त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे हे होते. तर, विचारमंचावर प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ.सुचिता कापसे, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे, एन.एस.एस. विद्यार्थी प्रतिनिधी कु. गायत्री पदमपल्ले आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना डॉ.चिवडे पाटील म्हणाल्या की, मुलींनी सकस आहार घेणे आवश्यक आहे. तरच, आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो.
फास्ट फूड मुळे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. ते टाळण्यासाठी मुलींनी सकस आहार घ्यावा मोबाईलचा अतिवापर टाळून योग्य प्रमाणात झोप घ्यावी व वेळोवेळी आपली एच बी ,कॅल्शियम आदींच्या तपासण्या करून घ्याव्यात. असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. सुचिता कापसे म्हणाल्या की, मुलींनी विशेष करून स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे. तरच, आपण वेगवेगळ्या आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकतो.आपल्या शरीराचा महत्त्वाचा घटक म्हणजे दात त्या, दातांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे म्हणाले की,मुलींनी डायटिंगच्या मागे न लागता सकस आहार घ्यावा व निरोगी जीवन जगावे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. चे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर, सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी व कु. गायत्री पदमपल्ले यांनी केले व आभार कु. विश्वनंदा नंदवंशी हिने मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
