महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा समारोप
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक विशेष युवक शिबिराचा समारोप सोमनाथपूर ता.उदगीर येथे झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव डॉ.आर.एन.लखोटिया, मंचावर संस्थेचे सदस्य प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, सरपंच अंबिका पवार, उपसरपंच अमित माडे, ग्रामविकास अधिकारी डी.एन.रोडेवाड, वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक खुशाल बराई, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मलिकार्जुन स्वामी, शिवयोगी वैजनाथआप्पा तोंडारे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे संस्कार आत्मसात करून भावी आयुष्यात आपल्या हातून अशी समाजसेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. समारोपात डॉ.लखोटिया म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सोमनाथपूर गावच्या विकासासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील असून, पुढेही आणखी असेच उपक्रम राबवून गावचा विकास केला जाईल. ग्रामस्थातर्फे प्रदीप पवार, विद्यार्थ्यातर्फे शुभम मोतीपवळे, भाग्यश्री नाईक यांनी शिबीर अतिशय उत्कृष्ट झाल्याची प्रतिक्रिया दिली. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी केले. शिबिराचा अहवाल रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.होकरणे यांनी सादर केला, सूत्रसंचालन प्रा.डॉ.बी.एस.कांबळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सुनंदा भद्रशेट्टे यांनी मानले.
