उदगीर पोलीस कोठडीतून पळून गेलेल्या आरोपीलाअटक स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर पोलिसांच्या नाकर्तेपणावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सतत पांडुरंग घालायचे काम सुरू केले आहे. अनेक ठिकाणी अवैध धंद्यावर छापेमारी करून ते धंदे बंद करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मात्र दुर्दैवाने स्थानिक पोलीस या अवैध धंद्याकडे कानाडोळा करत आहेत. इतकेच नाही तर पोलिसांच्या हातातून आरोपी देखील फरार होत आहेत. त्या फरार झालेल्या आरोपींना अटक करण्याचे काम देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला करावे लागत आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 379/2022 कलम 307,323,506,143,147,148,1490 भा.द.वी.सह 135 म.पो.का, प्राणघातक हल्ला, दंगा अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी लखन ईश्वर कसबे (रा. करडखेड ता. उदगीर) याला अटक करण्यात आली होती. वर नमूद गुन्ह्यात तो अटकेमध्ये असताना उदगीर ग्रामीण पोलीसांच्या कायदेशीर रखवालीतून दिनांक 02/09/2022 रोजी पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. परंतु तो मिळून येत नव्हता. कायदेशीर रखवालीतून पळून गेल्याने त्याच्यावर पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे पोलीस कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन नमूद फरार आरोपीस ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक बनवून त्यांना मार्गदर्शन व सूचना करून नमूद फरार आरोपीला ताब्यात घेण्याकरिता प्रयत्न करण्यात येत होते.
नमूद फरार आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीवरून दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी सदरचे पथक लातूर येथील गरुड चौक परिसरातून संशयीत आरोपी कसबे यास ताब्यात घेण्यात आले.
सदर आरोपी नामे लखन ईश्वर कसबे (रा. करडखेल, वय 28 वर्ष)याचेवर उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 379/2022 कलम 307, 323, 506, 143, 147, 148, 1490 भादवी.135 मपोका, पोस्ट उदगीर ग्रामीण गुन्हा रजिस्टर क्रमांक 397/2022 कलम 224 भादवी. प्रमाणे गुन्हे दाखल असून तो सदरच्या गुन्ह्यात पाहिजे होता. लखन ईश्वर कसबे यास पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव,पोलिस अंमलदार बालाजी जाधव, खुरर्म काजी, सचिन मुंडे ,दिनेश देवकते, प्रमोद तरडे ,विनोद चिलमे , यशपाल कांबळे ,रवी गोंदकर,यांनी केली आहे.