चोरीच्या गुन्ह्यातून जामीनवर सुटताच परत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चोरलेल्या मोटारसायकलसह अटक

चोरीच्या गुन्ह्यातून जामीनवर सुटताच परत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चोरलेल्या मोटारसायकलसह अटक

लातूर (एल.पी.उगीले) : चोरीच्या गुन्ह्यात जेल भोगत असलेला आरोपी, काही तांत्रिक कारणे सांगून पॅरोलच्या सुट्टीवर आला होता. मात्र “जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही”, असे म्हणतात. किंवा “कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच” असेही ग्रामीण भागात म्हणतात. अगदी तशाच पद्धतीने या चोरट्याने आपल्या चोरीच्या कला कौशल्याला वाव मिळावा म्हणून पुन्हा चोऱ्या करण्याचा सपाटा चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बारीक नजरेने नेमलेल्या विशेष पथकाने त्या चोरट्याला चोरलेल्या मोटार सायकलसह अटक करून संबंधित पोलीस स्टेशनच्या हवाली केले आहे.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पथकाकडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर मोहीम अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते.

सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 13/01/2023 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी हा नुकताच चोरीच्या गुन्ह्यातून जिल्हा कारागृह लातूर येथून जामीनावर सुटलेला सराईत गुन्हेगार सुमित दगडू गर्गेवाड हा असण्याची शक्यता आहे. अशी माहिती मिळाल्याने माहितीची शहनिशा व विश्लेषण करून सदर पथक नमूद गुन्हेगार वावरणाऱ्या त्या-त्या भागात आरोपीचा शोध घेतले असता मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित नामे- सुमित दगडू दर्गेवाड, (वय 25 वर्ष, राहणार मळवटी रोड,सिद्धेश्वर नगर, लातूर) यास दिनांक 13/01/2023 रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीतील श्याम नगर येथून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून अधिक तपास करून नमूद पथकाने त्याच्याकडून चोरलेली 1 लाख 10 हजार रुपये किमतीची पल्सर मोटर सायकल जप्त केली आहे. नमूद आरोपीना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

चोरीच्या गुन्ह्यातून जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटताच दुसऱ्याच दिवशी परत चोरीचा गुन्हा करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करून मोटार सायकल जप्त करून आरोपीस अटक केलेली आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस अमलदार बेल्लाळे , प्रताप वांगे ,अर्जुन राजपूत , गोविंद चामे, शिंगाळे, शिंदाडकर,जाधव यांनी पार पाडली .

About The Author