संशोधन हा शैक्षणिक धोरणाचा चेहरा आहे – डॉ. सतीश ससाणे
अहमदपूर (गोविंद काळे) : पारंपरिक शिक्षण व्यवस्था ही आता कालबाह्य झाली असून, येत्या काळात येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत असताना संशोधनाला अग्रक्रम द्यावा लागणार आहे. किंबहुना संशोधन हाच नवीन शैक्षणिक धोरणाचा चेहरा आहे, असे प्रतिपादन सामाजिक विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ डॉ. सतीश ससाणे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयक्यूएसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ संशोधन पद्धती’ या विषयावर झालेल्या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर विचारपीठावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. ससाणे म्हणाले की, भारतासारख्या विकसनशील देशात संशोधनाला खूप वाव असून, सामाजातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संशोधन होणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, संशोधन ही एक तपश्चर्या असून संशोधकांच्या अंगी जिद्द चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम केले पाहिजे. येथे बुद्धिमत्तेचा कस लागतो. चिंतनातून निष्कर्ष काढावे लागतात असेही, ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी विभागाचे प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आतिश आकडे यांनी केले तर डॉ. सचिन गर्जे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.