शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करणार – सचिन दाने यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करणार - सचिन दाने यांचा इशारा

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खारिप पीकविमा २०२१ व नुकसान भरपाईची देय रक्कम तात्काळ मिळावी यासाठी आंदोलने करूनही फायदा होत नाही.या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा दिनांक २१ जानेवारी पासून मागण्या मान्य होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

यावेळी बोलताना दाने म्हणाले की,शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी यासाठी हप्ता भरलेला होता. नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.विमा कंपनीकडून वेळेत पंचनामे करण्यात आले नाहीत.भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात संबंधित कंपनी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून काही फायदा होत नाही. दि.९ जानेवारी रोजी पीकविमा आणि इतर मागण्यांसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.त्याचा फायदा झाला नाही. सन २०२२ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.बहुतांश शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही.तो विमा तात्काळ मिळावा.पीकविमा वितरण प्रक्रिया निर्दोष व पारदर्शी असावी.सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात योग्य पंचनामा करून विमा मिळावा.ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले त्याची पावती सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहीने शेतकऱ्यांना मिळावी.एकाच महसूल मंडळात, एकाच गटात विमा वितरणात असणारी तफावत दूर करावी. विमा वितरणाच्या व नुकसानीच्या याद्या ऑनलाइन प्रकाशित कराव्यात.त्या याद्या गावनिहाय लावाव्यात.यात पारदर्शकता असावी.सर्व शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या पावत्या मिळाव्यात.

शेतकऱ्यांना विमा हफ्ता भरण्यास ठराविक मुदत असते त्याप्रमाणेच विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास मुदत असावी. शेतकऱ्यांना योग्य दाबाने किमान आठ तास दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा.थकित वीज बीलाच्या सबबीखाली वीज जोडणी तोडू नये.जे एजंट पंचनामा करत होते त्यांनी शेतकऱ्यांकडून १०० ते ३०० रुपये पर्यंत प्रति शेतकरी लाच घेऊन लूट केली.त्या लुटणाऱ्या एजंट वर गुन्हे दाखल करावेत. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी,आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते. दि.१३ रोजी झालेल्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात आला नाही.यामुळे उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे दाने म्हणाले. अनेक वेळा शेतकऱ्यांनी विनंती करून देखील कृषी विभागाकडून किंवा विमा कंपनी कढून पीकविमा रक्कम अद्याप मिळाली नाही.त्यावर काही कार्यवाही देखील झाली नाही,म्हणून नाईलाजास्तव वार शनिवार दि.२१ जानेवारी पासून मागण्या मान्य होई पर्यंत उपोषण करण्याचा इशारा दाने यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी गोपाळ काका पवार, मल्लिकार्जुन हलकंचे, परमेश्वर माने, सुधाकर गरड, पाशाभाई शेख व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author