सायकल चालवणारी माणसं जास्त काळ जगतात प्रा.डॉ शिवाजीराव चव्हाण
उदगीर (एल.पी.उगीले) : पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची सर्वात महत्त्वाची गरज बनलेली आहे. यंत्राच्या माध्यमातून आपले जीवन सुखी बनवण्याच्या नादामध्ये आपण पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आलेला आहोत. पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषण यामुळे माणसांचे जीवन ,आरोग्य धोक्यात आलेले आहे .यावरचा सर्वात मोठा उपाय म्हणजे सायकल प्रवास होय .यामुळे ऊर्जेत बचत होते,आरोग्य चांगले बनते. आणि प्रदूषण टळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सायकल चालवणारी माणसे जास्त काळ जगतात. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील लाईफ सायन्सेस विभागाचे संचालक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी काढले.
ते शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास संकल्पनेवर आधारित बामणी येथील विशेष वार्षिक युवक नेतृत्व शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोषाध्यक्ष नामदेव चामले, कार्यकारिणी सदस्य दत्तू जाधव, प्राचार्य डॉ. विनायक जाधव, बामणी गावच्या सरपंच प्रभावती बिराजदार, चेअरमन पदमीनबाई मुदाळे, जि प्र प्राथमिक बामणी शाळेचे मुख्याध्यापक वाय एन पठाण, राजकुमार बिरादार, उपप्राचार्य डॉ. एस व्ही जगताप, सिनेट सदस्य ग्रंथपाल डॉ.विष्णू पवार, प्रबंधक बालाजी पाटील, विजयकुमार पाटील आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले, सायकल चालवल्यामुळे आपल्याला विविध फायदे होत असतात. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सायकल चालवायची असते. त्यातून आपले आरोग्य सुधारते, पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा. अशा पद्धतीचे मार्गदर्शन त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना व गावकऱ्यांना केले. अध्यक्षिय समारोपप्रसंगी प्राचार्य जाधव यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले, आणि गावकऱ्यांनी शिबिर घेण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले. व शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या शिबिराचे आणि कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. एस व्ही शिंदे,प्रा.ए एस टेकाळे यांनी केले. स्वयंसेवकासोबत डॉ एस डी नीटुरे ,डॉ यू के शीरसी, प्रा एन एस केंद्रे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी नितीन शेंडगे, गोविंद पाटील यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. एस व्ही शिंदे यांनी ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंतनू जाधव ,प्रा बालाजी सूर्यवंशी यांनी केले. तर आभार डॉ.विष्णू पवार यांनी मानले .कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.