भाषिक न्युनगंड हा मराठीच्या भविष्यासाठी आवघड – गुडसूरकर
उदगीर (एल.पी.उगीले) : भाषा या एकमेकांच्या भगिनी असल्या तरी आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला असायलाच हवा.मराठी माणसाचा भाषिक न्युनगंड हा मराठीच्या भविष्यासाठी मारक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले.जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने आयोजित उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते,अध्यक्षस्थानी जिल्हा न्या.डी.पी.सातावळेकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून तदर्थ जिल्हा न्या. पी.डी.सुभेदार, दिवाणी न्या.जे.सी. गुप्ता, दिवाणी न्या.के.ए.पोवार,एन.जे.चव्हाण, वकिल संघाचे अध्यक्ष अॕड. बी.पी.नवटक्के, सरकारी वकिल अॕड. शिवाजी बिरादार ,अॕड.महेश मळगे उपस्थित होते.
“कोणतीही भाषा आक्रमक नसते,ती दुसऱ्या भाषेला संपवत नाही,मात्र एखाद्या भाषेचे अनुयायी स्वतःच्या भाषेवरची निष्ठा सोडून दुसऱ्या भाषेशी सलगी करतात, तेव्हा ती भाषा पाझरु लागते. व मातृभाषेवर अन्याय होतो.दुर्दैवाने आज मराठी भाषिकांत ही संख्या वाढते आहे” अशी खंत गुडसूरकर यांनी व्यक्त केली.
“भाषा हे संपर्काचे साधन आहे,त्यामुळे सर्वाना कळणा-या भाषेत व्यवहार व्हायला हवा,न्यायिक प्रक्रियेत म्हणून मराठीचा वापर वाढायला हवा”अशी अपेक्षा न्या.सातवळेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.अॕड.महेश मळगे यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.