“किल्ले उदगीर” जतन आणि दुरुस्तीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामास हिरवा कंदील – आ. बनसोडे
उदगीर (एल.पी. उगीले) : उदगीर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी आणि जतन करण्यासाठी इतिहास पुरातत्व विभागाच्या वतीने दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी मान्यता मिळावी, जेणेकरून या ऐतिहासिक वास्तूच्या कामाला गती घेता येईल. अशी विनंती माजी गृह राज्यमंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पत्र पाठवून विनंती केली होती.
वास्तविक पाहता ना. मुनगंटीवार हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री असले तरीही आपण आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भात पक्ष विरहित राजकारण करून, गेल्या कित्येक वर्षापासून उपेक्षित राहिलेल्या उदगीर विधानसभा मतदारसंघाला न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका घेऊन आपण कार्य करत असल्याचे आ. संजय बनसोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सत्ता असे लागणार नसेल उदगीर विधानसभा मतदारसंघाचा विकास सतत चालूच राहिला पाहिजे या दृष्टीने आपण भविष्यातही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पानिपत” या चित्रपटामुळे उदगीरच्या किल्ल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कारण पानिपतच्या युद्धावर जाण्यापूर्वी मराठ्यांनी निजामावर मोठा विजय उदगीरच्या लढाईत मिळवला होता. त्या लढाईची साक्ष देणारा “किल्ले उदगीर” हा ऐतिहासिक असून याच ऐतिहासिक वास्तूमध्ये उदगीर पंचक्रोशीचे श्रद्धास्थान उदागीरबाबा यांची समाधी आहे. त्या श्रद्धास्थानाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक, भक्तगण मोठ्या संख्येने उदगीर किल्ल्यात जातात.
त्यासाठी उदगीर किल्ला या स्मारकाच्या पुढील टप्प्याच्या जतन व दुरुस्ती कामाचे सर्वंकष विकास आराखडा व पुढच्या टप्प्याचे सुधारित सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्याबाबत पुरातत्व विभागास निदर्शन द्यावेत, तसेच त्यास प्रशासकीय मान्यता मिळावी. जेणेकरून सध्या सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामासोबतच पुढील टप्प्याचे काम हाती घेता येईल. अशी विनंती केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिव सांस्कृतिक विभाग यांना या किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीच्या संदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे उर्वरित कामाला देखील गती येईल. अशी अपेक्षाही आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.