आपल्या जीवनानुभवांनाच शब्दरूपाने साहित्यातून अजरामर केले पाहिजे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

आपल्या जीवनानुभवांनाच शब्दरूपाने साहित्यातून अजरामर केले पाहिजे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी वाचनाबरोबरच लेखनही केले पाहिजे. आपण लिहितो त्या अक्षरांना अर्थवत्ता प्राप्त होण्यासाठी जीवनात आलेल्या अनुभवांनाच शब्दरूप दिले पाहिजे, असे प्रतिपादन मराठीतील ज्येष्ठ लेखक, समीक्षक, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या परिसराचा, भवतालाचा, समाजाचा नीट अभ्यास केला पाहिजे. निरीक्षणातून खरे शिक्षण मिळत असते. जीवनात आलेल्या अनुभवातून समृद्ध साहित्याची निर्मिती केली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आविष्कार’ विशेषांकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल मुंडे यांनी सूत्रसंचालन विश्वनंदा नंदवंशी हिने केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author