विवेकावर आधारित संवादी जीवन जगावे – ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस
अहमदपूर( गोविंद काळे) आज राजकारणी लोक दिशाहीन बनलेली असल्याचे सांगून समाजाला योग्य दिशा व नव तरुणांना संस्कारीत बनवण्यासाठी तरुणांनी विवेकावर आधारित संवादी जीवन जगावे असे जाहीर आवाहन सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. ते दि. 17 रोजी वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सोहळ्यात मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष सत्यनारायणभाऊ काळे, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सौ ललिताताई सबनीस, मसाप चे कार्यवाह प्रा. द. मा. माने, प्राचार्य डॉ. निळकंठ पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले की, मानवी कल्याणाच्या सर्वांगीण विकासासाठी समता, बंधुता, राष्ट्रीय एकता, एकात्मता, सर्वधर्मसमभावाची सकारात्मक बेरीज करून नव संस्कृतीचे जग उभे करावे असे सांगून मराठी भाषेला सन्मानाची आणि तिला राजभाषेचा दर्जा द्यायला पाहिजे असे सांगितले. यावेळी मसाप च्या वतीने उपस्थित मान्यवरांचा दस्ती, टोपी, ग्रंथ व पुष्पहार देऊन संपत्नीक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन प्राचार्य यादव कर्डिले यांनी तर आभार महेंद्र खंडागळे यांनी मांनले. या सोहळ्याला साहित्यिक मोहीब कादरी, प्राचार्य डॉ. राजेश गोरे, ग्रंथपाल एल. बी. सूर्यवंशी, रमाकांत बिलापट्टे, एस. बी. केंद्रे, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य, यांच्यासह प्रा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पसायदानंतर सोहळ्याची सांगता करण्यात आली.