उदगीरात चोरट्यांचे चांगभले!!
दिवसा ढवळ्या लुबाडले गेले भलेभले !!!
( बसस्थानकातून महिलेचे १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास)
उदगीर / एल.पी.उगीले : उदगीर शहरात चोरीच्या अनेक घटना घडू लागले आहेत. त्यामुळे उदगीर शहरात राज्य कायद्याचे की चोरांचे? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. चोरट्यांनी जणू उदगीर शहर पोलिसांना आव्हान दिले आहे, पोलीस मात्र चोरट्यासमोर हतबल झाले आहेत. हतबल झालेल्या पोलिसांकडून उदगीरच्या जनतेला सावध राहा, आत्मनिर्भर व्हा, महिलांनी दागिने झाकून वापरावेत, सर्व नागरिकांनी सावध राहावे असे केविलवाणे आवाहन केले जात पोलिसांच्या अशा हास्यास्पद आवाहनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सध्या संक्रांतीचा सण असल्यामुळे महिलांना दागिन्याची हौस असते, दागिने घालून मिरवावे असे वाटत असते, मात्र याच काळात पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे महिलाही हतबल झाल्या आहेत.
परवाच उदगीर येथील बसस्थानकातून एका प्रवासी महिलेच्या बॅगेतून एक लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याची दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जमुनाबाई माधव गिरी ( रा. नारायणखेड जि. मेदक ) यांनी उदगीर शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार उदगीर बसस्थानकामध्ये सायंकाळी चार ते साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले एक लाख रुपये किंमतीचे गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याचे गंठण आणि ४० हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठया असे एकूण एक लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले आहेत. अशी तक्रार फिर्यादी महिलेने उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सोमवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु. र. नं २५ / २३ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
उदगीर शहरात मागच्या काही महिन्यापासून वारंवार महिलांचे दागिने चोरीच्या घटना , घरफोडी , दुकानफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. गुन्हेगारावर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे वारंवार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. निष्क्रिय व सुस्त पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.