मातृभाषेची चाड असावी मात्र इतर भाषेची चीड नसावी – रामचंद्र तिरुके
उदगीर/एल.पी.उगीले : प्रत्येकाला आपल्या मातृभाषेची चाड असली पाहिजे, मात्र इतर भाषांबद्दल चीड नसावी; असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके यांनी उपस्थितांना केले.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘गोंधळ’ या लोककलाप्रकाराचे शंकर तोकडे, रमाकांत पाचंगे, योगेश घोगरे ,मनोज रेनके यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात रामचंद्र तिरुके बोलत होते.
तिरुके पुढे म्हणाले की, लोकसंस्कृती, लोकविधी या प्रकारांमधून समाजजीवन समृद्ध होत असते. भाषा, संस्कृती आणि समाज यांचा समन्वय व सुसंवाद असावा. सर्वांनी मातृभाषेवर प्रामाणिकपणे प्रेम करावे, ते जपावे. असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण संदीकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ. बी. आर. दहिफळे व आभार उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी मानले.
कार्यक्रमाची रूपरेषा मराठी विभागप्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार यांनी सादर केली. डॉ. अर्चना मोरे, डॉ. बालाजी होकरणे, डॉ. मंजुनाथ मानकरी, डॉ. रमेश मुलगे, प्रा. बळवंत मॅडम, डॉ. सोमवंशी, डॉ. घोंगडे व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.