पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे ठरतात भारी !!!
उदगीर शहरातून आणखी एका ऑटोरिक्षाची चोरी !!!

पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे ठरतात भारी !!!<br>उदगीर शहरातून आणखी एका ऑटोरिक्षाची चोरी !!!

उदगीर / एल.पी.उगीले : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर तालुक्यातून दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने चोरीला नेऊन कमी किमतीमध्ये इतर राज्यात विकणे, किंवा त्या वाहनाचे सुटे भाग करून त्याची विक्री करणे. असे उद्योग धंदे करणारे चोरटे सक्रिय झाल्याची चर्चा आहे. एखादी टोळीच असावी अशी ही शंका आता ऑटो रिक्षा चालकांमध्ये व्यक्त केली जात आहे. पोलिसांची बघायची आणि रामभरोसे भूमिका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाला काळीमा फासणारी आहे. कित्येक वर्षानंतरही आजही उदगीर मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनकरराव शिंदे, दीपक जतकर यांचे नाव गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून उदगीरकर घेतात. कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांना उदगीरची जनता सतत डोक्यावर घेत असते, त्यांचा योग्य सन्मानही करते त्यामुळेच इतक्या वर्षानंतरही त्यांचा नाम उल्लेख आवर्जून केला जातो.
या गोष्टीचे गांभीर्य डोळ्यासमोर ठेवून उदगीर पोलिसांनी काम करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. कारण उदगीर शहरातून मागच्या काही महिन्यांमध्ये तीन-चार ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. ऑटोरिक्षा पळविणारे रॅकेट उदगीरात सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान ऑटोरिक्षा चोरीच्या घटना वाढल्याने ऑटो चालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
काशीराम तांडा ( ता. उदगीर ) येथील रहिवाशी असलेले फिर्यादी ऑटो चालक गणेश शिवाजी चव्हाण यांनी त्यांचा ऑटो रिक्षा क्रमांक एम. एच. २४ इ ६१३४ हा
रात्री साडेसात ते साडेआठ वाजताच्या सुमारास उदगीर शहरातील चर्च रोड परिसरात पार्किंगला उभा केला होता. पार्किंगला उभा असलेला ५० हजार रुपये किमतीचा जुना ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अशी तक्रार ऑटोचालक गणेश शिवाजी चव्हाण यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सोमवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा र. नं. २४ / २३ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोहेकॉ गोलंदाज हे करीत आहेत.
उदगीर शहरात मागच्या काही महिन्यापासून ऑटोरिक्षा चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे उदगीरात ऑटो रिक्षा चोरीचे रॅकेट सक्रिय झाल्याची चर्चा ऑटो चालकांमधून ऐकण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये उदगीर शहरातून तीन ते चार ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले आहेत. परंतु ऑटोरिक्षा चोरट्यांना पकडण्यात उदगीर शहर पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. उदगीर शहरात चोरीच्या घटना वाढल्यामुळे येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उदगीर मधील चोरीच्या घटना रोखण्यासाठी आणि चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी कार्यक्षम अधिकारी द्यावा. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

About The Author