बांधकाम कामगारांसाठी मोफत मध्यान्ह भोजन योजनेच्या दुसऱ्या केंद्राचे उद्घाटन संपन्न
आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून कष्टकऱ्यांना मोफत पोटभर जेवन
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील जवळपास 3600 महाराष्ट्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळावा. या उद्देशाने माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्री असताना विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांसाठी “सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा” या उद्देशाने सुरू असलेल्या मध्यान्ह मोफत भोजन योजना सुरू केली. डोंगरशेळकी येथील दुसऱ्या केंद्राचे उद्घाटन प्रसंगी उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब मरलापल्ले हे बोलत होते.
याप्रसंगी या योजनेचा लाभ घेणारे नरसिंग नवनाथ कांबळे, शांता वेंकट कांबळे, नवनाथ संग्राम कांबळे, संग्राम यशवंत गायकवाड, भरत यशवंत कांबळे, प्रभावती लहू कांबळे, गौतम रामराव कांबळे, शोभा राजेंद्र कांबळे, कविता विश्वंभर गजभारे, केवळबाई विद्यासागर कांबळे इत्यादी उपस्थित होते.
पुढे बोलताना बाळासाहेब मरलापल्ले यांनी महाराष्ट्र नोंदणी कृत बांधकाम कामगारांना लागू असलेल्या 29 योजनांचा लाभ आपल्या मतदारसंघातील कष्टकरी कामगारांना मिळावा, तसेच त्यांना कामाच्या ठिकाणी शासनामार्फत दुपारी दर्जेदार आणि पौष्टिक जेवण मिळावे. या उद्देशाने आ. संजय बनसोडे यांनी विशेष प्रयत्न केले. दुपारच्या जेवणात भाकरी, दोन भाजी, वरण, भात अशा पद्धतीचे पोषक घटक असलेले जेवण दिले जात आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातील जवळपास 3600 बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या मोफत मध्यान्ह भोजन योजनेसोबतच या कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना, शिक्षण नोंदणीकृत कामगार पाल्य यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्षी एक लाख रुपये शिष्यवृत्ती, अभियांत्रिकी साठी साठ हजार रुपये प्रतिवर्षी तसेच शासनमान्य पदविकेसाठी वीस हजार रुपये तसेच पदवीत्तर पदवीसाठी 25 हजार रुपये दोन अपत्यासाठी दिले जातात. तसेच कामगारांच्या पत्नीच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी 15000 आणि शस्त्रक्रिये नंतरच्या प्रसूतीसाठी 20000 रुपये दोन अपत्यासाठी शासनाकडून दिले जातात. तसेच यदाकदाचित या कष्ट करणाऱ्या कामगारांना गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी एक लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत लाभार्थी कामगार, त्याच्या किंवा तिच्या कुटुंबीयांना दिली जाते. तसेच एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावावर अठरा वर्षापर्यंत एक लाख मुदत बंद ठेव योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते.
दुर्दैवाने कामगारास कायमचे अपंगत्व आल्यास किंवा 75 टक्के अपंगत्व आल्यास दोन लाखापर्यंत अर्थसाह्य दिले जाते. यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कामगारांसाठी लागू आहेत. कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत केली जाते, तसेच नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये दिले जातात. कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.
50 ते 60 वर्षे वयोगटाच्या दरम्यान कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये तसेच गृह कर्जावरील 6 लाखापर्यंतच्या व्याजासाठी दोन लाख रुपये अर्थसाह्य शासनाच्या वतीने केले जाते. अशा विविध योजनांचा लाभ आपल्या मतदारसंघातील कष्ट करणाऱ्या कामगारांना देखील मिळाला पाहिजे. अशी भूमिका घेऊन विकासाचा टप्पा गाठ गाठत माणुसकीचाही टप्पा गाठण्यात उदगीरचे आ. संजय बनसोडे हे आघाडीवर आहेत. असेही गौरवोद्गार याप्रसंगी बाळासाहेब मरलापल्ले यांनी व्यक्त केले.
उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य, उपेक्षित असलेल्या कष्ट करणाऱ्या कामगारांचे हित विचारात घेऊन त्यांच्यासाठी शासनाच्या वतीने सुरू केलेल्या योजना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी आ. संजय बनसोडे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघात ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसेच जे कामगार नोंदणीकृत नाहीत त्यांनी आपली अधिकृत नोंदणी करून घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा. असेही आवाहन याप्रसंगी बाळासाहेब मरलापल्ले यांनी केले.