कुस्त्या या यात्रा, महोत्सव आणि सणावारासाठी न राहता कायम तालमी चालू राहाव्यात – आ. संजय बनसोडे

कुस्त्या या यात्रा, महोत्सव आणि सणावारासाठी न राहता कायम तालमी चालू राहाव्यात - आ. संजय बनसोडे

जळकोट (एल.पी.उगीले) : सध्या तंत्रज्ञानाचे युग आल्याने आणि मध्यंतरीच्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला गेल्याने, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आला आहे. एका बाजूला हे प्रगतीचे लक्षण दिसत असले तरी, मोबाईलचा अतिवापर आणि मोबाईलवरचे खेळणे हे शरीरासाठी आणि मानसिकतेसाठी घातक होऊ शकतात.

विद्यार्थ्यांना मैदानी खेळाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. मैदानी खेळामुळे खेळाडूंचे शरीर आणि मन निरोगी राहते. सुदृढ शरीरामध्येच निकोप मन राहत असते, त्यासाठी ग्रामीण भागातून मैदानी खेळाला प्राधान्य दिले जावे, शहरी भागात क्रीडांगणे फार कमी झाली आहेत. कमी जागेमध्ये देखील दर्जेदार खेळ खेळता येतात, त्याचाच एक भाग म्हणजे कुस्ती होय. त्यासाठी पारंपरिक चालत आलेली कुस्त्यांची तालीम गावोगावी चालू राहिली पाहिजे. केवळ यात्रा, महोत्सव आणि सणावाराला कुस्त्याचे फड न लावता प्रत्येक गावात व्यायामशाळे सोबतच तालमीची व्यवस्था करावी. असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी केले.

ते जळकोट तालुक्यातील मौजे मरसांगवी येथे शादावल सहाब उरूस (उत्सवाच्या) निमित्ताने आयोजित कुस्त्यांच्या फडात आ. संजय बनसोडे यांनी हजेरी लावून सर्व पैलवानांना प्रोत्साहन दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मैदानी खेळासाठी प्रत्येक गावातून मैदान निर्माण करावे. केवळ जिम साठीच प्रयत्न न करता कुस्त्यासारख्या खेळाची परंपरा जपण्याची जबाबदारी देखील ग्रामीण भागावरच आहे, आणि ती परंपरा जळकोट तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून अनेक गावातून जपली जाते. याबद्दल मला आनंद वाटतो. माझ्या परीने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जे जे सहकार्य लागेल, ते ते आपण शासन दरबारी पाठपुरावा करून मिळवून देऊ. खेळाडूंसाठी आणि क्रीडांगणासाठी शासनाच्या कित्येक योजना आहेत. त्या योजना खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.

या कुस्त्याच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळकोट तालुकाध्यक्ष आगलावे मामा, काँग्रेसचे अध्यक्ष मनमथआप्पा किडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मारुतीराव पांडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामराव राठोड यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटच्या कुस्तीपर्यंत थांबून विजेत्या पैलवानांना आ. संजय बनसोडे यांच्या वतीने नगदी रोख रक्कम आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे शादावल साहब उरूस प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी या महोत्सवात माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे उपस्थित राहिल्यामुळे उपस्थित पैलवान आणि ग्रामीण जनतेमध्ये नवचैतन्य पहावयास मिळत होते.

About The Author