हरीनामात “वाल्याचा, वाल्मीक” करण्याची आघाद शक्ती आहे – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगीले) : या सृष्टीचा रचियता, कुणी त्याला परमेश्वर म्हणेल, कोणी आल्लाह म्हणेल, कोणी गॉड म्हणेल, त्याच्या नामस्मरणात आघाद अशी शक्ती आहे. वाल्या कोळ्याची कथा आपल्याला माहिती आहे. प्रभूराम चंद्राचे नाव घेत घेत तो वाल्मिकी ऋषी होऊन गेला. हा चमत्कार नामस्मरणाने झाला. असे उद्गार माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी काढले.
ते दावणगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अशा पवित्र कार्यक्रमात हजेरी लावताना मला मनस्वी आनंद वाटतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये परमेश्वराबद्दल प्रचंड निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीभाव पहावयास मिळतो. सध्या घाई गर्दीच्या काळात जीवन जगण्याची प्रचंड घाई झालेली आहे, परमेश्वराची आठवण करायला देखील कोणाला वेळ नाही. मात्र ग्रामीण भागातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि सर्व सजीवाबद्दल प्रेम, जिव्हाळा बाळगून जीवन कंठीत करावे. हाच संदेश सांगितला जातो.
जगामध्ये कोणताही धर्म एक दुसऱ्याबद्दल द्वेष शिकवत नाही, मात्र त्या त्या परिस्थितीमध्ये काही लोक त्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. धर्माची ज्याला जाण आहे, परमेश्वराबद्दल ज्याची निष्ठा आणि श्रद्धा आहे, ती व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना सदाचाराला प्राधान्य देते. हा आपला अनुभव आहे. ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली. मानवी जीवन दिले. त्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचरण करणे गरजेचे आहे. असेही माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या तरुण वर्गामध्ये धर्माची जाण राहिली नसल्यामुळे वेगवेगळ्या व्यसनाकडे तरुण वर्ग आकर्षित होतो आहे, त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी हरिनाम सप्ताह गाव पातळीवर उत्कृष्ट माध्यम आहे. संतपरंपरेची जपवणूक आणि संत परंपरेची शिकवण अंगीकारली तर निश्चितपणे जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती मिळू शकेल. असेही आ. संजय बनसोडे यांनी सांगितले. याप्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, भाविक भक्तगण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, दावणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन धनाजी मुळे तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.