आ. काळे यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – भरत चामले
उदगीर (एल. पी. उगिले) : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आ. विक्रम वसंतराव काळे यांची घोषणा केलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणाच्याही अफवांना बळी न पडता, आमदार विक्रम काळे यांना विक्रमी मताधिक्य कसे मिळवता येईल. यासाठी प्रयत्न करावेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे सर्व सोबत असल्यामुळे आमदार विक्रम काळे यांचा विजय तर ठरलेलाच आहे. मात्र मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे औरंगाबाद विभागाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघ उदगीरचे चेअरमन भरत चामले यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेकापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नवाडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून त्यांनी आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांसाठी केलेले कामे तसेच विविध प्रश्नांसाठी उठवलेला आवाज यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली.
पुढे बोलताना भरत चामले यांनी स्पष्ट केले की महाविकास आघाडीच्या सर्व घटकांच्या वतीने एक मुखी उमेदवारी जाहीर झाली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, अशी अफवा पसरवली जाते आहे. ती चुकीची असून महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष सक्रियपणे विक्रम काळे यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटनेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य कोणत्याही कार्यकर्त्याकडून घडू नये. आपले अस्तित्व हे आपल्या पक्षावर अवलंबून असते. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाने दिलेले आदेश आपण पाळावेत, तेच आपले कर्तव्य आहे. असेही भरत चामले यांनी याप्रसंगी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेलचे युवा नेते युवराज कांडगिरे यांनी केले.