रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह ६ लाख ८३ हजारांचा ऐवज चोरीला!
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील फिर्यादी सेवानिवृत्त प्राध्यापकाची आरोपी सून व अन्य तिघांनी संगणमत करून फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ८३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. अशी तक्रार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यावरून सुनेसह अन्य तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , फिर्यादी सेवानिवृत्त प्राध्यापक सोमेश्वर वैजनाथ रोडगे ( रा. हावगीस्वामी कॉलनी बिदर रोड उदगीर ) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची सून संसयित आरोपी जयश्री उत्तरेश्वर मंदोडे ( रा. हडफसर पुणे ) व सुनेचे नातलग संशयित आरोपी निर्मला उत्तरेश्वर मंदोडे , रोहन उत्तरेश्वर मंदोडे ( दोघे रा. आदर्श कॉलनी परतूर जि. जालना ) , लामदडे पाटील ( रा. माकणी ता. अहमदपूर ) यांनी संगणमत करून फिर्यादी हे दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी कामानिमित्त लातूर येथे गेले असता आरोपी फिर्यादीच्या उदगीर शहरातील हावगीस्वामी कॉलनीतील घरी गेले. आरोपींनी घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील देवघरात ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे चार तोळे सोन्याच्या पाटल्या , अडीच लाख रुपये किमतीचे पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या , एक लाख ९० हजार रुपये किमतीचे ३.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम ४३ हजार रुपये असा एकूण ६ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज घरातून आरोपींनी चोरून नेले आहेत. याबाबत जर तुम्ही पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला खल्लास करून टाकतो. अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाची तक्रार फिर्यादीने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून आरोपी सुनेसह अन्य तीन जणांविरुद्ध गुरुवारी ( दि. १९ जानेवारी ) रोजी गु. र. नं. २९ / २३ कलम ४५४ , ३८० ,५०६ , ३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत.