2 मोटरसायकल व मंदिरातून चोरलेल्या दानपेटीसह 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने वेगवेगळ्या गुन्ह्याची उकल करत आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत एलसीबी उत्कृष्ट तपास करत आहे. चोरीस गेलेल्या दोन मोटार सायकल सह मंदिरातून दानपेटी चोरल्या प्रकरणातील एक लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक केले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 22/01/ 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील वाहन जुपिटर कंपनीची स्कूटर घेऊन संशयित आरोपी नामे गणेश साळुंके हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ सदर ठिकाणी पोचून रोडवर ज्युपिटर स्कूटरसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव गणेश श्रीकांत साळुंखे (वय 22 वर्ष राहणार कैलास नगर लातूर) असे असल्याचे सांगितले.तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहन व एका लोखंडी दानपेटी संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची ज्युपिटर स्कूटर काही दिवसापूर्वी लातूर पंचायत समितीच्या पाठीमागून चोरी केलेली आहे. तसेच सदरची दानपेटी दोन दिवसांपूर्वी विशाल नगर येथील काशी विश्वेश्वर मंदिरातून तो आणि त्याचे अन्य दोन साथीदार अशा तिघांनी मिळून ज्युपिटर स्कूटर, दानपेटी चोरी केलेली असल्याचे कबूल केले. नमून आरोपी त्यांनी चोरलेल्या ज्युपिटर स्कूटर व दानपेटी संदर्भाने अनुक्रमे शिवाजीनगर व एमआयडीसी येथे चोरीचे गुन्हे दाखल असून पुढील कायदेशीर कार्यवाही करिता गुन्ह्यातील आरोपी गणेश साळुंखे यास पुढील कार्यवाहीसाठी जप्त मुद्देमालसह शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर दोन आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच आणखी एका कार्यवाहीत संशयित इसम नामे मोतीलाल उर्फ कुक्या बादल शिंदे, (वय 22 वर्ष, राहणार मोहा,तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद)याचे कडून होंडा शाईन कंपनीची मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 124 मुंबई पोलीस अधिनियम प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शिताफीने गोपनीय माहितीचे संकलन करून तात्काळ कारवाई करत लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल व दानपेटीचोरी चा गुन्हा उघडकीस आणून नमूद आरोपींता कडून दोन मोटरसायकल व एक दानपेटी, मोबाईल असा एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीस्तव नमूद आरोपींना पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात पोलिस अमलदार राजेन्द्र टेकाळे, प्रकाश भोसले, नवनाथ हाजबे, तूराब पठाण,योगेश गायकवाड, रामहारी भोसले, मोहन सुरवसे, प्रदिप चोपणे यांनी केली आहे.