मंडळ अधिकारी मजगे व तलाठी गुंडरे यांच्यावरील गुन्हा व दोषारोपपत्र मा. उच्च न्यायालयाकडून रद्द
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील संग्राम पात्रे यांनी तक्रार दिल्यावरून उदगीर शहर पोलिसांनी बनावट व खोटा फेरफार केला म्हणून दिनांक 04/12/2020 रोजी तत्कालीन मंडळ अधिकारी दिलीप मजगे व तलाठी शिवानंद गुंडरे यांच्या विरोधात कलम 420,465,466,467,468,469,167 व 34 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा रद्द करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी वकील राम शिंदे बोरोळकर यांच्यामार्फत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेत दिवाणी न्यायालय, मा. उच्च न्यायालय व महसूल न्यायालयाने निकाल हे धनको यांच्या हक्कात दिलेला निकाल न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कुठलीही बनावट कागदपत्रे तयार केलेले नाहीत. तक्रारदार यांच्या कथनानुसार झालेला फेरफार हा कायदेशीर व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केल्याचे नमूद केले, व यामध्ये कोणाचीही फसवणूक झालेली नाही. तक्रारदार यांनी पोलीस यंत्रणेशी संगणमत करून खोटा गुन्हा दाखल करून बेकायदेशीर अटक करण्यात आली असा युक्तिवाद केला.
मा. उच्च न्यायालयाने अर्जदाराने जोडलेल्या कागदपत्राचे व पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राचे अवलोकन केले. तसेच सरकारी वकील बोराडे व तक्रारदाराचे वकील अवटेकर यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदरील गुन्हा हा बेकायदेशीर असल्याचे नमूद केली, तसेच मा. न्यायालयाने अशीही निरीक्षण नोंद दिली आहे की, तलाठी, मंडलधिकारी यांच्यावर नोंदविलेला गुन्हा हा कायद्याचा गैरवापर आहे. अर्जदार यांच्या विरोधात कुठलाही सबब पुरावा तपासात आढळून आलेला नाही. यामुळे सदरील गुन्हा व दोषारोप पत्र मा. उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. अर्जदार यांच्यावतीने वकील राम शिंदे बोरोळकर यांनी काम पाहिले.
