भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी मतदान करावे – डॉ व्ही डी गायकवाड

भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी मतदान करावे - डॉ व्ही डी गायकवाड

उदगीर (एल.पी.उगीले) : मतदान हे आपले कर्तव्य आहे .चांगले शासन आणण्यासाठी मतदारांनी आपले मतदान करावे. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे,मतदान हे दान आहे त्या दातृत्व भावनेने मतदान करायला हवे.भारतीय लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी मतदान करावे, असे मत राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.डी गायकवाड यांनी काढले. शिवाजी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विनायक जाधव तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे, अधीसभा सदस्य डॉ.विष्णू पवार, कार्यक्रमाधिकारी डॉ एस व्ही शिंदे यांची होती.

पुढे बोलताना डॉ गायकवाड म्हणाले, मतदारांनी उदासीनता न दाखविता आपले कर्तव्य म्हणून मतदान करावे.सर्वांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच भारतीय लोकशाहीचे सक्षमीकरण होईल, असेही त्यांनी उद्गार काढले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, मतदान हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे. मतदान करण्यामध्ये अनेक वेळा आपल्याला उदासीनता दिसते. ती उदासीनता बाजूला सारून सर्वांनी मतदान करावे. असे विचार त्यांनी मांडले. यावेळी मतदान जनजागृतीची शपथ प्रा बिरादार बी डी ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस एम कोनाळे यांनी तर आभार डॉ एस व्ही शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!