अल-अमीन विद्यालयात प्रजासत्ताक दिन अनेक कार्यक्रमानी साजरा
उदगीर : येथील अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयातर्फे अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भाषण स्पर्धा ‘मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना’ हा विषय पाचवी ते आठवी वर्गासाठी व नववी, दहावी वर्गासाठी ‘भारत भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ’ या विषयावर अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. मराठी व उर्दू लेखन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा हा कार्यक्रम खूपच रंगतदार ठरला. याशिवाय मैदानी स्पर्धेमध्ये क्रिकेट, धावणे, स्लो सायकलिंग, लिंबू रेस, प्रश्नमंजुषा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात त्यात सहभाग घेतला.
प्रजासत्ताक दिनी सकाळी ठीक आठ वाजून दहा मिनिटांनी प्रमुख पाहुणे उदगीरचे प्रतिष्ठित व्यापारी शेख रफिक शेठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर विविध स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. बक्षीस वाटप प्रमुख पाहुण्या व्यतिरिक्त संस्थेचे सचिव शेख अकबर साहेब, संस्थेचे सदस्य शेख क़यामोद्दीन साहेब व मुख्याध्यापक शेख मुंतजीबोद्दीन यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
