विद्यार्थी केंद्रबिंदू मानून महाविद्यालयाने ‘नॅक’ करून घेतले पाहिजे – डॉ. कमलाकर गव्हाणे

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून महाविद्यालयाने 'नॅक' करून घेतले पाहिजे - डॉ. कमलाकर गव्हाणे

अहमदपूर (गोविंद काळे) : बेंगळूरू येथील ‘नॅक’ ही संस्था देशात उच्च शिक्षणाच्या मूल्यांकनाचे मुलभूत कार्य करीत असून,सध्याच्या काळात सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून महाविद्यालयाचे मूल्यांकन नॅक करून घेतले पाहिजे. मात्र ‘ नॅक’ च्या मूल्यांकनात यशस्वी होण्यासाठी संस्था, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. कमलाकर गव्हाणे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात आय. क्यू. ए. सी. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ रिवाईज्ड अक्रेडिटेशन ऑफ नॅक फ्रेमवर्क ‘ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, विचारपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, आय. क्यू. ए. सी. विभागाचे प्रमुख प्रो.डॉ. नागराज मुळे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. गव्हाणे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या या काळात प्रत्येक महाविद्यालयाने करून घेणे बंधनकारक आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थीकेंद्री भूमिका घेऊन नॅक मूल्यांकन करून घेतले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर विवेचन केले. या कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालयाने मागील वेळेस चांगली भूमिका बजावली होती. त्यावेळेस ‘बी ‘ हा ग्रेट मिळाला होता. दुसऱ्यांदा मूल्यांकन करून घेण्यास महात्मा फुले महाविद्यालय तयार असून, यावेळेस आम्ही अधिक तयारी करून ‘ ए’ ग्रेड मिळविण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहू, असेही ते याप्रसंगी म्हणाले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रो. डॉ.नागराज मुळे यांनी केले. सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.आतिश आकडे यांनी केले तर,संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!