लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे – डॉ. श्याम शिंदे
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्यघटनेने ३२६ व्या कलमानुसार सर्व प्रौढ भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार बहाल केला असून, लोकशाही टिकविण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे प्रतिपादन महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राज्यघटनेचे गाढे अभ्यासक डॉ. श्याम शिंदे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘मतदार जागृती दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शिंदे हे बोलत होते.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अहमदपूर शहरातून भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅली ची सुरुवात प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांनी श्रीफळ वाढवून महाविद्यालयातून केली. तसेच, ही रॅली शिवाजी चौक, आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयात आणण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार बबीता आळंदे, नायब तहसीलदार डी.एन.दंताळे, नायब तहसीलदार डी.के. मोरे, निवडणूक विभागातील अधीक्षक यांनी एन. बी. अर्जुने, एच. एम. शेकडे आदींनी या रॅलीचे स्वागत केले व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते; तर विचारपिठावर उपप्राचार्य डॉ.डी.डी. चौधरी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश चौकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, लोकशाहीचे रूपांतर कधीही झुंडशाहीत होऊ शकते आणि झुंडशाहीचे रूपांतर हुकूमशाहीत व्हायला वेळ लागत नसतो. म्हणून प्रचंड कष्टाने, त्यागाने मिळविलेले स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल तर मतदारांनी सतत जागृत राहून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या काळातील होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. पैसे देऊन आणि घेऊन मतदान करणे हा राष्ट्रीय स्वरूपाचा गुन्हा असून, अशाप्रसंगी युवकांनी स्वतःहून पैसे देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. तरच भारतातली लोकशाही टिकेल असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश चौकटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रेय चव्हाण यांनी केले तर कु. वैष्णवी मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
