फैज़ ए आम च्या रक्तदान शिबीरात २०१ पिशव्यांचे संकलन
अहमदपूर (गोविंद काळे) : ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील विविध सामाजिक उपक्रम राबवणारी फैज़ ए आम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अब्दुल गनी काॅम्पलेक्स येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात तब्बल २०१ पिशव्यांचे रक्तदान झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेख वाजीद अब्दुल गनी हे होते तर उद्घाटक म्हणून अहमदपूरचे पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड होते यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय बिरादार, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बायजीद यांची उपस्थिती होती. यावेळी वैद्यकीय अधीक्षक बिरादार म्हणाले की,फैज़ ए आम चॅरिटेबल ट्रस्ट अहमदपूर ही संघटना सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक उल्लेखनीय कार्य घडले आहे तर प्रमुख पाहुणे मोहसीन बायजीद म्हणाले की, आजपर्यंत या संघटनेने अनेक समाजोपयोगी उपक्रम अहमदपूर व परिसरात राबवले असून हे रक्तदान शिबीराचे दुसरे वर्ष आहे या संघटनेने विशेषतः शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि अशा प्रकारच्या शिबीरांचा समाजातील प्रत्येक घटकाला निश्चितच फायदा पोहचतो.तसेच पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड म्हणाले की,या संघटनेने विशेषतः आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.अध्यक्षीय समारोपात शेख वाजीद यांनी आज धार्मिक सलोखा कसा महत्त्वाचा असतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हाफिज गालीब साहब यांनी केले सूत्रसंचालन काजी फारुख यांनी केले तर आभार हाफिज इर्शादसाहब यांनी केले. यावेळी संकलित रक्तदानाच्या २०१ पिशव्यांचे संकलन सिव्हील हॉस्पिटलच्या लातूर यांच्या चमूने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैज़ ए आम चॅरिटेबल ट्रस्ट अहमदपूरच्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
