उदयगिरीत सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत महाविद्यालयातील आजादी का अमृत महोत्सव समिती, क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमीचे औचित्य साधून सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार संतोष गुट्टे होते. सूर्यनमस्कार प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थिनी लक्ष्मी बिरादार यांनी भूमिका पार पाडली. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, नवनिर्वाचित सिनेट सदस्य ग्रंथपाल डॉ.विष्णू पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना संतोष गुट्टे म्हणाले, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांना योगासने व सूर्यनमस्कार हेच उत्तर असू शकते. त्यामुळे सर्वांनी नियमित व्यायाम करावा. असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. संस्था सचिव रामचंद्र तिरूके म्हणाले, विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी लवकर उठून मैदानावर आले पाहिजेत, तसेच योगासन, प्राणायाम व सूर्यनमस्कार नियमितपणे केलाच पाहिजे, त्यामुळे शरीर समृद्ध आणि सुदृढ राहील, त्यातूनच आपले ध्येय साध्य होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा.सतीश मुंडे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी होकरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आजादी का अमृत महोत्सव समिती प्रमुख डॉ.एस.आर.नागोरी, डॉ.गौरव जेवळीकर, प्रा.रोहन एनाडले यांनी पुढाकार घेतला.
