पो. नि. कदम यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव
लातूर (एल.पी.उगिले) : जिल्ह्यातील जळकोट येथे कार्यरत असलेले जळकोट पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जळकोट तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम टिकउन ठेवत पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी इतर कामे ही उत्कृष्ट पद्धतीने पार पाडून आपले कर्तव्य निभावल्याबद्दल कौतुकाची थाप देण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून हा सन्मान करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कर्तबगार आणि उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याची परंपरा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरू केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे पोलीस प्रशासना अंतर्गत एक निकोप स्पर्धा लागली आहे, अपवाद वगळता सर्व कर्मचारी व अधिकारी आपापल्या परीने उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जनतेमध्ये सतत मिसळणारे व जनसामान्यांना आपलेसे करणारे अधिकारी म्हणून पो. नि. परमेश्वर कदम हे जिल्ह्याला सुपरीचीत आहेत. यापूर्वी त्यांनी शिरूर आनंदपाळ येथे उत्कृष्ट कार्य केल्याचे आजही लोक सांगतात.
