वलांडी व तळेगाव बिट कार्यक्षेत्रांत बनावट विषारी दारूविक्री मोठ्या प्रमाणात!
देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वलांडी व तळेगाव बिट कार्यक्षेत्रांत दारूचा महापूर वाहत असून, परराज्यातून आणलेल्या विदेशी मद्यामध्ये रसायन मिश्रित करून, महाराष्ट्रात विक्री केल्या जाणाऱ्या दारूच्या बाटल्या ती रसायन मिश्रित बनावट व विषारी दारू भरून सर्रास विक्री होत असल्याने तळीरामांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या भागामध्ये अनेक वेळा धाडी टाकून लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले होते. मात्र या बनावट दारूतून भरमसाठ उत्पन्न मिळत असल्याने स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांकडून येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे पुन्हा तोच धंदा तेजीत आणला आहे. या कार्यक्षेत्रांचे बिट अंमलदार हे दारू विकृत्याबरोबर आर्थिक हितसंबंध ठेवून असल्याचाही आरोप केला जातो आहे. पोलीस प्रशासनाकडूनच अवैध धंदेवाल्यांना अभय मिळत असून या बिट मधील दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अशी मागणी आत्ता महिला वर्गातून केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, वलांडी व तळेगाव (भो.)हे या परिसराचे दारूविक्रीचे महा केंद्र बनले आहे. कोरोना काळात देशभरातील वाहतूक व्यवस्था बंद असतांना सुद्धा गोवा येथील वेगवेगळ्या कंपनीचे लेबल असलेले अनेक प्रकारचे देशी, विदेशी मद्य, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी घातलेल्या धाडीत ट्रकच्या ट्रक मिळून आले, असे धाडीचे प्रकार अनेक वेळा होऊनही दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा प्रकार देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना माहिती नसेल असे म्हणणे हास्यास्पद होईल अशी ही चर्चा सुरू आहे.
दारू तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही होतांना दिसून येत नाही. या बिटमधील गावांपैकी केवळ एक नागराळ गावं सोडलं तर तळेगाव व वलांडी बिट अंतर्गत सर्वच गावात दारूचा महापूर चालू आहे. नागराळ येथे एक दारूचा थेंब सुद्धा विकला जात नसतांनाही येथील दारुड्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागराळ येथील बेटाच्या पाठीमागे नागराळ कोनाळी सीमेवर कोनाळी येथील दारूविक्रते आपल्या शेतात पत्र्याचे शेड मारून अवैध देशी दारूचे दुकाने थाटले असून ही दारू दुकाने अगदी अर्धा किमी च्या अंतरावर असल्यामुळे कोनाळीच्या दारूविक्री करणाऱ्याचा नागराळ येथील लोकांना उपद्रव वाढला आहे नागराळ पेक्षा कोनाळीचा अंतर जास्त असल्याने व कोनाळीत दारू मिळत असल्याने शेतीत कोणी येत नाहीत, कोनाळीच्या दारूविकृत्याने केवळ नागराळ येथील बेवड्यासाठी नागराळ, कोनाळी सीमेवर दारुदुकाने थाटली आहे. हे सर्व बिट अंमलदार यांना माहिती असून सुद्धा त्यावर एकदाही कारवाई केली गेली नाही. नागराळ दारू विक्रीच्या बाबतीत सतर्क असतानाही दारूमुळे येथील अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.दारूविक्री करणाऱ्याना प्रोत्साहन देणाऱ्यांना बिट अंमलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागराळ येथील महीलांनी केली असून पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारेही मागणी करणार असल्याचे सांगितले.
