अकरा हजार सूर्यनमस्करांचा विक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : पंतजली योग समिती,भारत स्वाभिमान व ज्येष्ठ नागरिक संघ उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा.
रथसप्तमी या दिवशी जिल्हा परिषद मैदान उदगीर येथे जागतिक सूर्यनमस्कार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शहरातील जवळपास 30 शाळांना आमंत्रित करण्यात आलेले होते. त्यापैकी 25 शाळा या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत्या. प्राथमिक, माध्यमिक गटातून अकराशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिवे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचबरोबर रमेश अंबरखाने यांनी अध्यक्षपद भूषवले.
प्रस्ताविकामध्ये बलसूरकर यांनी जेष्ठ नागरिक संघाची भूमिका या ठिकाणी विशद केली. त्याचबरोबर सुरेंद्र अक्कनगिरे यांनी पतंजली योग समितीची भूमिका स्पष्ट केली, पतंजली योग समितीने गेल्या वीस वर्षातील केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. कित्येक शतकापूर्वी पतंजली मुनीनी लिहिलेल्या पतंजली योग या ग्रंथाचा उल्लेख त्यांनी केला. आजच्या काळात प.पु. रामदेवजी स्वामी यांनी समाजामध्ये योगाचा प्रसार कोणत्या पद्धतीने केला, याबाबतीत विद्यार्थ्यांना व नागरिकांना सखोल अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर योग कोणत्याही एका जाती-धर्माचा अविष्कार नसून सर्वसामान्य कोणत्याही व्यक्तीला योगाचा उपयोग करून आपल्या आरोग्याची काळजी घेता येते. याबद्दल त्यांनी मत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी राजे, ममहाराणा प्रताप, यांच्या कार्याचा गौरव त्यांनी या ठिकाणी केला.
प्राणायाम हा मानवी जीवनातील मोलाची बाब आहे, याबाबत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. मानवी जीवनातील योगाचे प्रमुख पाहुणे प्रवीण मेंगशेट्टी यांनी शालेय जीवनातील योगाचे महत्व व सूर्यनमस्काराचे महत्त्व उद्घोषित केले. त्याचबरोबर शालेय शिक्षणात सूर्यनमस्कार व योगाचा समावेश करावा. याबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. शिवाय पतंजली योग समिती करत असलेल्या योगप्रसाराच्या व विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून देण्याच्या कार्याचे व सामूहिक सूर्यनमस्कार दिन आयोजित करण्याच्या कार्याबद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले. शालेय जीवनापासूनच योगाचे धडे विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दैनंदिन सूर्यनमस्कार केल्यामुळे आरोग्य बालवयापासूनच लाभते. असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, यावर त्यांनी भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्याचबरोबर कोणताही गुन्हा घडण्याअगोदर त्यापूर्वी जर आपण खबरदारी घेतली तर गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल. असेही उपस्थित पालकांना त्यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी पाहुण्यांपुढे व उपस्थित नागरिकांपुढे सामूहिक सूर्यनमस्कार घातले. त्याप्रसंगी उमाकांत अंबेसंगे यांनी शंख नाद करून तिथे जमलेल्या हजारो मनामध्ये प्रेरणा निर्माण केली.
त्यानंतर पाच शाळांचा गट याप्रमाणे सूर्यनमस्कारांची स्पर्धा घेण्यात आली, व निवड झालेल्या शाळांना ट्रॉफी व सहभागी असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अशा रीतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र यंदे यांनी केले. आभार प्रदर्शन विरभद्र कप्पिकेरे यांनी केले . सूर्य नमस्कार स्पर्धेत पंच म्हणून प्रा.श्रीराम चामले ,सहशिक्षक राजकुमार नगरे, व मु.अ. कपिकेरे विरभद्र यांनी काम पाहिले.
या प्रसंगी पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रा. बसलिंग गारठे,अध्यक्ष सुरेंद्रजी अकनगिरे राज्य संयोजक धनराज बिरादार,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. रमाकांत मधवरे, लातूर जिल्हा महिला प्रभारी सौ मीनाक्षी स्वामी ताई, दीपक बलसुरकर, पतंजली योग समितीचे कोषाध्यक्ष शिवकुमारजी शिरगिरे, सचिव प्रा श्रीराम चामले, संरक्षक नरेंद्र यंदे , उमाकांत अंबेसंगे लातूर जिल्हा अध्यक्ष रामजी घाटगे , मल्लिकाजुन रोडगे,भारत स्वाभिमानचे अध्यक्ष वीरभद्र कपिकेरे, शिवलिंग मठपती, तालुका महिला प्रभारी सौ सूमती ताई भातांब्रे , अहमदपुरचे जेष्ट योग शिक्षक शिवमुर्ती आप्पा भातांब्रे , सौ कलावती भातांब्रे,विश्वनाथराव बिरादार माळेवाडीकर, नरेंद्र शिंदे, मधुमती शिंदे,सौ. स्मिता पोतदार,विश्वनाथ उदबाळे,राम राजे,मंगेश शिरगिरे, हुरदळे सतनप्पा, अजय श्रिवास्तव, प्रसिद्घ व्यापारी अनिल पत्तेवार यांच्याकडुन सन्मान चिन्ह मिळाली.
