डॉक्टर चंबुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कोरोना रुग्णांकडून कौतुक
उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने त्रस्त झालेल्या रुग्णांना युद्धपातळीवर प्रयत्न करून कोरोना मुक्त बनवण्यात उदयगिरि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे योगदान मोठे आहे. अशा पद्धतीचे भावनिक विचार दुरुस्त झालेल्या अनेक कोरोना रुग्णांनी समाज माध्यमावर व्यक्त केले आहेत. सामाजिक जाणीवा जपत केवळ व्यवसाय म्हणून न पाहता अत्यंत आत्मीयता, जिव्हाळा जपत रुग्णांचे मनोधैर्य वाढवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती वाढवण्याचे काम उदयगिरि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने उदगीर मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे, व्हेंटीलेटर बेडची कमतरता आहे, वेळेवर रेमडीसिवर इंजेक्शन भेटत नाही, अशा पद्धतीच्या चर्चेमुळे अनेक रुग्ण हवालदिल झाले होते. अनेकांनी वेगवेगळ्या तज्ञांना आपल्या प्रकृतीच्या अनुषंगाने चौकशीही केली होती. कोणी सोलापूरला, कोणी हैदराबादला, कोणी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. असे असले तरीही एका कोरोना रुग्णांने समाजमाध्यमावर लिहिले आहे. माझा डॉक्टर चंबुले आणि त्यांच्या सर्व सहकार्यावर विश्वास असल्याने मी त्यांच्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला आत्मविश्वास देत घाबरू नका. असा सल्ला दिला. कोरोना सदृश्य लक्षणे असली तरी प्रत्येक वेळी तो कोरोनाच असतो असे नाही. असे सांगून धीर देऊन मला स्वतंत्र खोलीमध्ये व्यवस्था करून माझ्यावर योग्य पद्धतीने उपचार करून मला पूर्णपणे बरे करून रुग्णालयातून सहीसलामत घरी पाठवले. एक अत्यंत संवेदनशील आणि माणुसकी जपणारा डॉक्टर म्हणूनच माधव चंबुले यांच्या कडे पाहिले जाते. त्यांना डॉ. ढोकाडे, डॉ रमण रेड्डी, डॉ बलशेटवार यांची साथ आहे. या रुग्णालयातील सर्वच रुग्णांना अतिशय आत्मीयतेने आणि रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा! या भावनेने सर्व कर्मचारी काम करत असलेले पाहून खरोखर धन्य वाटले. समाज माध्यमावर आलेले असे विचार पाहिल्यास एका बाजूला कोरोना रुग्णांची प्रचंड हेळसांड करून स्वार्थ साधणारी प्रवृत्ती, इतकेच नव्हे तर कोरोनाची खोटी चाचणी देणारी टोळी! इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी! असा सर्व बाजार चालू असताना देखील कांही देव माणसेही समाजात आहेत. याचा प्रत्यय टीम उदयगिरि कडून दिला जात आहे.